Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

गोदावरीच्या पात्रात प्रदूषणाची वाढ; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष कायमनाल्यांचे सांडपाणी, निर्माल्य व कपड्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

नांदेड शहरातून वाहणार्‍या पवित्र गोदावरी नदीच्या पात्रामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत असून, याकडे महानगरपालिका प्रशासनाचे होत असलेले दुर्

उष्णतेचा कहर : 43 अंशांपार तापमानाने नांदेडकर हैराण; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात



नांदेड शहरातून वाहणार्‍या पवित्र गोदावरी नदीच्या पात्रामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत असून, याकडे महानगरपालिका प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय बनले आहे. शहरातील विविध भागांतील सांडपाण्याचे नाले थेट नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यातच अंत्यसंस्कारानंतर नदीत टाकण्यात येणारे कपडे, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि अन्य धार्मिक कचर्‍यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
गोदावरी नदी ही नांदेड शहराची जीवनवाहिनी मानली जाते. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून या नदीला मोठे महत्त्व आहे. दररोज हजारो भाविक आणि नागरिक नदीकाठी दर्शन, स्नान आणि धार्मिक विधीसाठी येत असतात. मात्र, सध्या नदीच्या पात्रात साचलेला कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी आणि पसरलेले निर्माल्य यामुळे परिसराचे विद्रूप चित्र निर्माण झाले आहे. शहरातील अनेक नाले कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या सांडपाण्यामध्ये घरगुती सांडपाणी, रासायनिक घटक, प्लास्टिक आणि घातक कचर्‍याचा समावेश असल्यामुळे नदीतील जलचरांवरही परिणाम होत आहे. नदीच्या पाण्याचा रंग बदलत असून काही ठिकाणी फेस निर्माण होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, अंत्यविधीनंतर मृत व्यक्तींचे कपडे, चादरी, उशा तसेच पूजेतील निर्माल्य नदीमध्ये टाकण्याची प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक वेळा प्लास्टिकमध्ये भरलेले निर्माल्य थेट नदीत फेकले जाते. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर घाण साचत असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या घाणीमुळे दुर्गंधी वाढत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. नदीत मिसळणार्‍या नाल्यांवर प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. धार्मिक विधींसाठी येणार्‍या नागरिकांना सूचना फलक लावून नदी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्याचीही गरज व्यक्त होत आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी स्वच्छता मोहिमांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात नदीपात्रातील परिस्थिती बदलताना दिसत नसल्याची टीका नागरिकांनी केली आहे. स्वच्छ नदी, निरोगी शहर ही संकल्पना फक्त घोषणांपुरती मर्यादित राहू नये, तर प्रशासनाने ठोस कृती आराखडा राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण रोखावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS