नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून निवड झालेल्या महापौर कविता संतोष मुळे यांच्या कारकिर

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून निवड झालेल्या महापौर कविता संतोष मुळे यांच्या कारकिर्दीला ६ जून रोजी शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी सत्ताारोहण करताना त्यांनी शहराच्या विकासाचा कृती आराखडा आणि अनेक महत्त्वाकांक्षी संकल्प पक्ष नेतृत्वासमोर मांडले होते. मात्र, शंभर दिवसांनंतर या संकल्पांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी झाली आणि नांदेडकरांच्या पदरात नेमके काय पडले, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.
महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शहरात नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा, गोदावरी नदी प्रदूषणमुक्ती, नागरिकाभिमुख प्रशासन आणि विकासकामांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघालेला दिसत नाही. उलट, पूर्वी तीन दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता पाच ते सहा दिवसांवर गेल्याची तक्रार अनेक भागांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्वच्छ आणि सुंदर शहराच्या घोषणांनंतरही अनेक भागांमध्ये कचऱ्याची समस्या कायम असून, स्वच्छता व्यवस्थेतील अपेक्षित सुधारणा अद्याप नागरिकांना जाणवलेली नाही. रस्ते, नालेसफाई आणि सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाची गती अद्याप मंद असल्याचेच चित्र आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प हा महापौरांच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा विषय मानला जात होता. मात्र, आजही शहरातील अनेक नाले कोणत्याही प्रक्रिया केंद्राशिवाय थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत आहेत. सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्याची यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालल्याची पर्यावरणप्रेमींची भावना आहे.
दरम्यान, महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला राज्यातील सत्ता, जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन राज्यसभा खासदार आणि महायुती सरकारची ताकद लाभलेली असतानाही शहराच्या मूलभूत प्रश्नांवर अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने विरोधकांकडूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाश जिल्ह्यातील राज्यसभा सदस्यांनीही या शंभर दिवसांच्या कामकाजाचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
सव्वा वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड झालेल्या कविता मुळे यांच्या नावाची नोंद नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून निश्चितच झाली आहे. मात्र, इतिहासात केवळ प्रथम महापौर म्हणून नव्हे, तर शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून नोंद व्हावी, यासाठी पुढील काळात आश्वासनांचे रूपांतर प्रत्यक्ष कामांमध्ये करणे, हीच त्यांच्यासमोरील खरी कसोटी ठरणार आहे.

COMMENTS