Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेतील दारुची दुकाने हटवा; नागरिकांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

अकोले : शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यालगत व परिसरात असणारी भरवस्तीतील अवैध दारूची दुकाने हटविण्यात यावी. अन्यथा १ एप्रिल २०२६ पासून दारूबंदी आंदोलन

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
प्रभाग १४ मधील मंजूर कामे तातडीने सुरु करा : नगरसेवक लहिरे
शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान

अकोले : शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यालगत व परिसरात असणारी भरवस्तीतील अवैध दारूची दुकाने हटविण्यात यावी. अन्यथा १ एप्रिल २०२६ पासून दारूबंदी आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अकोले पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा शहर व  तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी दिला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरात भरवस्तीत असणाऱ्या खटपट नाक्यावरील कोल्हार-घोटी राज्य मार्गालगत डॉ. विराज शिंदे यांच्या हॉस्पिटल शेजारील देशी दारूचे दुकान व शिवाजी चौक रस्त्यालगत विजय फूट वेअर समोरील वाईन शॉप यामुळे नागरिकांना विशेषतः येणाऱ्या जाणाऱ्या महिला, तरुणी यांना दारू पिणाऱ्या लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सातत्याने दारू पिणारे लोक भांडणे व शिवीगाळ करीत असतात. तसेच रहदारीस, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करतात. शाळेत जाणाऱ्या लहान मुला-मुलींना देखील मोठा त्रास सहन करावा लागत असतो.

 आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अलिकडेच घेतलेल्या आमसभेमध्ये ही दुकाने हलविण्याच्या संदर्भात गंभीर चर्चा होऊन देखील अद्याप यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. संबंधित दुकाने शहराबाहेर १५ दिवसांच्या आत हलवावी.अन्यथा पोलीस ठाण्यासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक दारूबंदी आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिलपासून महिलांसह मोठ्या संख्येने बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते जे. डी. आंबरे, डॉ. नीलेश सहाणे, डॉ. विराज शिंदे, डॉ. साहेबराव वैद्य, डॉ. कमलाकर सातपुते, डॉ. नितीन चासकर, डॉ. दर्शन बंगाळ, डॉ. संदेश भांगरे, डॉ. आसिफ तांबोळी आदिंनी दिला आहे.

 या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपविभागीय अधिकारी संगमनेर, तहसीलदार, मुख्याधिकारी आदिंना पाठविण्यात आल्या आहे.

COMMENTS