कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आता वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दूरवर अहिल्यानगर गाठण्याची गरज उरणार नाही. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आरोग्य विभागाने श्रीरामपूर येथेच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी श्रीरामपूर येथे दिव्यांगांची तपासणी करून त्यांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोपरगावसह राहाता, संगमनेर, अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील सहा वर्षांपासून आमदार काळे यांनी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत जवळपास दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे. २०१९ पासून त्यांनी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कोपरगावहून जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था केली होती. तसेच संपर्क कार्यालयामार्फत आवश्यक मार्गदर्शन व मदतीची यंत्रणा उभी केली होती. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना शासकीय प्रमाणपत्र मिळविणे सुलभ झाले. मात्र अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय कोपरगावपासून सुमारे १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्याने दिव्यांग व त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन श्रीरामपूर, शिर्डी व राहाता परिसरातच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार काळे यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने मांडली होती. पालकमंत्र्यांकडेही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे अकोले ते अहिल्यानगर १२७, संगमनेर ते अहिल्यानगर १०७, कोपरगाव ते अहिल्यानगर १००, राहाता ते अहिल्यानगर ८० आणि श्रीरामपूर ते अहिल्यानगर ६७ किलोमीटरचा प्रवास टाळता येणार आहे. परिणामी दिव्यांग बांधवांचा प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊन वेळ व खर्चाचीही बचत होणार आहे. दरम्यान, या सुविधेबाबत दिव्यांग बांधव व त्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत. या उपक्रमासाठी राज्य सरकारमधील संबंधित मंत्र्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. “मतदारसंघातील एकही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. कमीत कमी वेळेत व सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. तसेच कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यांत तेथेही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आता वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दूरवर अहिल्यानगर गाठण्याची गरज उरणार नाही. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आरोग्य विभागाने श्रीरामपूर येथेच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी श्रीरामपूर येथे दिव्यांगांची तपासणी करून त्यांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोपरगावसह राहाता, संगमनेर, अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील सहा वर्षांपासून आमदार काळे यांनी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवत जवळपास दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे. २०१९ पासून त्यांनी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कोपरगावहून जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था केली होती. तसेच संपर्क कार्यालयामार्फत आवश्यक मार्गदर्शन व मदतीची यंत्रणा उभी केली होती. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना शासकीय प्रमाणपत्र मिळविणे सुलभ झाले.
मात्र अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय कोपरगावपासून सुमारे १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्याने दिव्यांग व त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन श्रीरामपूर, शिर्डी व राहाता परिसरातच तपासणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार काळे यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने मांडली होती. पालकमंत्र्यांकडेही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे अकोले ते अहिल्यानगर १२७, संगमनेर ते अहिल्यानगर १०७, कोपरगाव ते अहिल्यानगर १००, राहाता ते अहिल्यानगर ८० आणि श्रीरामपूर ते अहिल्यानगर ६७ किलोमीटरचा प्रवास टाळता येणार आहे. परिणामी दिव्यांग बांधवांचा प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊन वेळ व खर्चाचीही बचत होणार आहे.
दरम्यान, या सुविधेबाबत दिव्यांग बांधव व त्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत. या उपक्रमासाठी राज्य सरकारमधील संबंधित मंत्र्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
“मतदारसंघातील एकही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. कमीत कमी वेळेत व सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. तसेच कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यांत तेथेही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. – आमदार आशुतोष काळे


COMMENTS