नांदेड : महावितरण च्या नांदेड शहर विभागाने वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरात

नांदेड : महावितरण च्या नांदेड शहर विभागाने वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वीज तक्रारींना तातडीने प्रतिसाद मिळावा, तांत्रिक बिघाड त्वरित दूर व्हावेत आणि रात्रीच्या वेळेत ग्राहकांची गैरसोय टळावी यासाठी आता महावितरणचा तक्रार निवारण कक्ष रात्री 12 वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे नांदेड शहरातील हजारो वीज ग्राहकांना मोठा आधार मिळणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे वीजेची मागणी लक्षणीयरीत्या वाढते. परिणामी काही भागांत तांत्रिक अडचणी, फ्यूज उडणे, तारांमध्ये दोष निर्माण होणे किंवा कमी दाबाचा पुरवठा अशा समस्या निर्माण होत असतात. विशेषतः सायंकाळनंतर वीज खंडित झाल्यास नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची दखल घेत महावितरणने कामकाजात हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नवीन आदेशानुसार कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यकांना सायंकाळी 4 ते रात्री 12 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करावा लागणार आहे. ही व्यवस्था 22 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आली असून शहरातील विविध उपविभागांमध्ये तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यात विद्युत भवन युनिट, टॉवर झोन, आनंदनगर विभाग तसेच तरोडा नाका परिसरातील शाखांचा समावेश आहे. महावितरणने कर्मचार्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. वीज खंडित झाल्याच्या प्रत्येक तक्रारीची तात्काळ नोंद घेणे, संबंधित तांत्रिक पथकाला माहिती देणे, फ्यूज ऑफ कॉल्स निकाली काढणे, ग्राहक संपर्क कायम ठेवणे आणि सर्व तक्रारींची स्वतंत्र नोंदवही अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर तिच्यावर कोणती कार्यवाही झाली याचीही सविस्तर नोंद ठेवावी लागणार आहे. या निर्णयामागे नागरिकांना चांगली सेवा देण्याचा उद्देश असल्याचे महावितरणच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेत वीज खंडित झाल्यास नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, पाणीपुरवठा विस्कळीत होतो आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष गैरसोय सहन करावी लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदेड शहरातील तरोडा नाका, आनंदनगर, टॉवर परिसर, वसाहती भाग आणि गजबजलेल्या वस्त्यांमध्ये या नव्या निर्णयाचा अधिक फायदा होणार आहे. अनेकदा सायंकाळनंतर संपर्क क्रमांक मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. आता मात्र तक्रार नोंदणी, प्रतिसाद आणि दुरुस्ती प्रक्रियेला गती मिळणार आहे. महावितरणने संबंधित कर्मचार्यांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनाही या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह मानला जात असून, वीज सेवा अधिक उत्तरदायी आणि तत्पर करण्याच्या दिशेने महावितरणचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. आता या नव्या व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी कितपत होते, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS