Homeताज्या बातम्या

नांदेडच्या वाहतुकीला शिस्त कधी?नव्या वाहतूक प्रमुखांसमोर कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान

नांदेड शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष, बेशिस्त ऑटोचालक, रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि नागरिकांची निष्क

दर्जेदार विकासकामांनी नाशिक सुंदर, आधुनिक शहर करणार : मुख्यमंत्री फडणवीस
सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी ५० सायबर पोलीस ठाणे
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू



नांदेड शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष, बेशिस्त ऑटोचालक, रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि नागरिकांची निष्काळजी वृत्ती यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी गर्दीच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक शाखेचे प्रमुख मारोती मुंडे यांच्यासमोर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहरातील शिवाजीनगर, वजीराबाद, अण्णाभाऊ साठे चौक, नाईक चौक,महावीर चौक, छत्रपती चौक, मालेगाव रोड, कॅनॉल रोड तसेच वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, श्रीनगर, आनंदनगर आणि बाबानगर परिसरात दररोज वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते. अनेक ठिकाणी ऑटोचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करतात, तर काही वाहनचालक कोणतीही सूचना न देता अचानक वळण घेत असल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे. मालेगाव रस्त्यावरील मोठ्या व्यापारी संकुलांमध्ये सायंकाळी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असल्याने कॅनॉल रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढतो. त्यातच अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे परिस्थिती अधिक गंभीर बनवितात. श्रीनगर, आनंदनगर, श्याम नगर आणि बाबानगर परिसरात विविध शिकवणी वर्ग असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. पालकांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. या संवेदनशील ठिकाणी वाहतूक पोलीस नियमितपणे दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणांचाही वापर सुरू आहे. मात्र केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहून प्रश्न सुटणार नाही. नियमांचे पालन करणे, नो-पार्किंगमध्ये वाहने न उभी करणे, सिग्नलचे पालन करणे आणि रस्त्यावर शिस्त राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नव्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखा विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करणार का, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर नियंत्रण आणणार का आणि शहराला कोंडीमुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणार का, याकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS