नांदेड : शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या बँकांच्या एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नसल्याने नागरिकांच्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत ग

नांदेड : शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या बँकांच्या एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नसल्याने नागरिकांच्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मालेगाव रोड, पूर्णा रोड, व्हीआयपी रोड, वजीराबाद, श्रीनगर, आनंदनगर आदी प्रमुख भागांतील अनेक एटीएम केंद्रे कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे चोरी, तोडफोड किंवा फसवणुकीच्या घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शहरातील बहुतांश एटीएममध्ये दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम केंद्रे अक्षरशः रामभरोसे सुरू आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यांचे नियमित निरीक्षण होते का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक एटीएममध्ये प्रकाश व्यवस्थाही अपुरी असल्याने रात्रीच्या वेळी ग्राहकांना असुरक्षित वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सायबर गुन्हे आणि एटीएम फसवणुकीच्या घटना वाढत असताना सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. एटीएम कार्ड बदलणे, स्किमिंग उपकरणे बसविणे किंवा संशयित व्यक्तींकडून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रात्रीच्या वेळेत पैसे काढण्यासाठी येणार्या ग्राहकांना अधिक असुरक्षित वाटत असल्याचे दिसून येते. अनेकदा एटीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मार्गदर्शन करण्यासाठीही कोणी उपलब्ध नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. शहरातील प्रमुख बँकांनी एटीएम केंद्रांवर पुन्हा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, सीसीटीव्ही यंत्रणा नियमित कार्यरत ठेवावी तसेच प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन संपर्क सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता ही बँकांची प्राथमिक जबाबदारी असल्याने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS