नांदेड : नांदेड शहरातील तरोडा परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणार्या मद्यपींचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक
नांदेड : नांदेड शहरातील तरोडा परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणार्या मद्यपींचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शेतकरी पुतळ्याजवळील मद्यविक्री केंद्रासमोर तसेच छत्रपती चौक परिसरातील मॉलसमोरील देशी दारू दुकानाजवळ संध्याकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यपींची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळ होताच या दोन्ही ठिकाणी शेकडो मद्यपी जमा होतात. दुकानातून मद्य खरेदी करून अनेकजण थेट रस्त्यावर, पदपथावर किंवा दुकानासमोरील मोकळ्या जागेतच प्लास्टिकच्या ग्लासमध्ये मद्यपान करत बसतात. काही जण वाहने उभी करून त्यातच मद्यपान करतात. त्यामुळे परिसरात गोंधळ, आरडाओरडा आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत आहे. मद्यधुंद अवस्थेत अनेकजण किरकोळ कारणावरून एकमेकांशी वाद घालत असून काही वेळा हे वाद हाणामारीपर्यंत पोहोचत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शिवीगाळ, धिंगाणा आणि मारामारीमुळे परिसरातील दुकानदार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व विद्यार्थिनींना या मार्गाने जाताना अस्वस्थता जाणवत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय मद्यपान करून रस्त्यावरच पडून राहणे, वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा टाकणे असे प्रकार रोजचे झाले आहेत. त्यामुळे परिसराची स्वच्छता बिघडत असून महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. सकाळी या ठिकाणी फुटलेल्या बाटल्या आणि प्लास्टिक कचर्याचा सडा दिसत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार उघडपणे आणि नियमित सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी असताना नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवावी, उघड्यावर मद्यपान करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, मद्यदुकानांच्या परिसरात सीसीटीव्ही देखरेख वाढवावी आणि रात्री विशेष पथक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तरोडा परिसर झपाट्याने विकसित होत असताना अशा प्रकारांमुळे परिसराची प्रतिमा मलिन होत असल्याचे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले. कुटुंबासह बाहेर पडताना असुरक्षित वाटते. रोज रात्री गोंधळ सुरू असतो. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली. दरम्यान, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी या प्रकाराची दखल घेऊन तातडीने संयुक्त मोहीम राबवावी, मद्यपींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

COMMENTS