बिलोली शहरातून भरधाव वेगाने धावणार्या हायवा ट्रक आणि अवजड वाहनांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत त

बिलोली शहरातून भरधाव वेगाने धावणार्या हायवा ट्रक आणि अवजड वाहनांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत तिघा निष्पाप नागरिकांचा बळी जाऊनही महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) अद्यापही गाढ झोपेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा तीव्र सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बिलोली शहरातील मुख्य रस्ते, शाळा परिसर, बाजारपेठ, चौक आणि गर्दीचे मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित झाले आहेत. दिवसभर अवजड हायवा ट्रक सुसाट वेगाने धावत असल्यामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे रस्त्यावर चालणेही धोकादायक बनले आहे. विशेषतः सकाळी शाळा सुरू होण्याच्या आणि दुपारी सुट्टीच्या वेळेत वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सगरोळी, कुंडलवाडी आणि बेळकोणी परिसरात झालेल्या भीषण अपघातांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय लहान-मोठ्या अपघातांची मालिका सातत्याने सुरूच असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. तरीदेखील संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या मते, अवजड वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन केवळ लहान वाहनधारकांवर नियमांचा बडगा उगारताना दिसत आहे. हायवा ट्रक चालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन, ओव्हरलोड वाहतूक आणि नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचीही चर्चा शहरात रंगू लागली आहे. हायवा मालक आणि काही अधिकारी यांच्यात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. गौण खनिज उत्खनन आणि अवैध वाहतुकीसंदर्भात अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही महसूल प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी मोहीम राबवण्यात आलेली नाही. दुसरीकडे आरटीओ विभागाची कारवाई केवळ कागदोपत्री किंवा दंड वसुलीपुरती मर्यादित असल्याची टीका होत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र वेग नियंत्रण, ओव्हरलोड वाहनांची तपासणी, परवाने पडताळणी किंवा नियमभंग करणार्यांवर कठोर कारवाई दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरूनच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती तर काही ठिकाणी निष्क्रियता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. रात्रीच्या वेळीही भरधाव हायवा ट्रक शहरातून धावत असल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. अवजड वाहनांना शहराबाहेरील पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, शाळा व बाजारपेठ परिसरात नो-एंट्री लागू करणे, वेगमर्यादेचे कठोर पालन, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आणि ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ तात्काळ थांबवून प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS