नायगाव : नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना अखेर मंगळवारी रात्री तूरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामु

नायगाव : नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना अखेर मंगळवारी रात्री तूरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
वादळी वाऱ्यामुळे बळेगावात झाडे उन्मळून पडली
तालुक्यातील बळेगाव परिसरात पावसासोबत आलेल्या जोरदार वादळी वार्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही लहान-मोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या जोरदार वार्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
जुनेगाव-राहेर येथे विजेचा खांब कोसळला
दरम्यान, जुनेगाव-राहेर येथील बसथांब्याजवळील विजेचा खांब कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बसची वाट पाहत टीनशेडच्या आडोशाला उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये यामुळे प्रचंड घबराट पसरली. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. संबंधित वीज वितरण विभागाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
पेरण्या रखडल्या; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
नायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर, बरबडा तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, हा पाऊस शेतीकामांसाठी अत्यंत अपुरा असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या अद्याप रखडलेल्या आहेत. मृग व आर्द्रा नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजाची चिंता अधिक वाढली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी शेतजमीन तयार ठेवून दमदार पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने सर्वांचे लक्ष आता पुढच्या पावसाकडे लागले आहे.

COMMENTS