नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणार्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचे धागेदोरे आता नागपूर, चंदपूरपर्यंत

नागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणार्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचे धागेदोरे आता नागपूर, चंदपूरपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात छापे टाकले. सीबीआयच्या विशेष पथकाने नागपुरातील दोन विद्यार्थीनींसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरावर छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, हस्तलिखित नोट्स तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे
या प्रकरणात नांदेडमधील व्यवहारांची चौकशी करताना ‘आलोक’ नावाचा संशयित सूत्रधार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर आला असून, त्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीटच्या जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांचे पेपर फुटल्याच्या आरोपांप्रकरणी सीबीआयच्या नवी दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी पेपरफूट प्रकरणी लातूरच्या ‘आरसीसी क्लासेस’चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, ‘आलोक’ या संशयिताने महाराष्ट्रासह देशातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा मध्यस्थांच्या साहाय्याने प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा होण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना पुण्यात बोलावून गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना संभाव्य प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून घेण्यात आल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. नांदेडमधील एका हॉटेल व्यावसायिक कुटुंबाची चौकशी करताना ‘आलोक’चे नाव प्रथम समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्युतनगर परिसरातील एका महिलेकडून तिच्या मुलीसाठी लाखो रुपयांत प्रश्नपत्रिका मिळविण्याचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही रक्कम संकेतधन म्हणून पाठविण्यात आली होती. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीला आणि तिच्या कुटुंबीयांना पुण्यात काही दिवस ठेवण्यात आले होते. तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, दूरध्वनी संपर्क, संदेशवहन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासत असून, या संपूर्ण जाळ्यामागे आणखी कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. परीक्षेत बेकायदेशीर लाभ मिळवून देण्यासाठी प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचा वापर करण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या अनुषंगाने आर्थिक देवाणघेवाण, संगणकीय नोंदी आणि संपर्क साखळीची पडताळणी सुरू आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणेकडून याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तपासाच्या गोपनीयतेमुळे अनेक बाबींवर मौन पाळण्यात आले आहे.
संसदीय समितीने घेतली दखल, उद्या होणार बैठक
प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या वाढत्या चर्चेनंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर दबाव वाढला आहे. संसदीय स्थायी समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या 21 मे रोजी या विषयावर संसदेतील बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून, परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.
अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS