अहिल्यानगर : नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून आर्थिक गैरव्यवहार आणि कथित धनशुद्धीकरण प्रकरणी अंमलबजा

अहिल्यानगर : नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून आर्थिक गैरव्यवहार आणि कथित धनशुद्धीकरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अशोक खरातला ताब्यात घेतले आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या विविध आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता परदेशात पलायन करण्याच्या कथित कटाची माहिती समोर आल्याने तपास यंत्रणांचे लक्ष अधिक तीव्र झाले आहे.
अशोक खरात तसेच संशयित आर्थिक व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात आणण्यात आले. आवारे यांच्या वतीने पुढील पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिक पोलिसांकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांनी अशोक खरातचा ताबा घेतला. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. धनशुद्धीकरण, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी फिरवल्याच्या आरोपांवरून स्वतंत्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, अटकेची शक्यता लक्षात आल्यानंतर अशोक खरातने आर्थिक व्यवहारांचा मोठा जाळा उभारल्याचा संशय आहे. कोपरगाव येथील एका पतसंस्थेत तब्बल 65 बनावट खाती उघडण्यात आली होती. केवळ चार दिवसांच्या कालावधीत या खात्यांमधून दोनशेहून अधिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यवहारांतून सुमारे 52 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, बँक व्यवहारांवरील मर्यादांचा गैरफायदा घेत लहान रकमेतील व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. काही खात्यांमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींसह महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्यांच्या नावांचा वापर करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील जाळे आणखी व्यापक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS