देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील आरडगाव व देवळाली प्रवरा येथे बेकायदेशीर खाजगी सावकारकी करणाऱ्या दोघांच्या घरांवर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील आरडगाव व देवळाली प्रवरा येथे बेकायदेशीर खाजगी सावकारकी करणाऱ्या दोघांच्या घरांवर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (दि. २४) सकाळी अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
आरडगाव येथील प्रवीण धसाळ यांच्या तक्रारीवरून तालुका सहायक उपनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने सकाळी सुमारे १० वाजता बापूसाहेब अशोक धसाळ यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. मात्र तपासणीदरम्यान तेथे कोणतेही संशयास्पद साहित्य आढळून आले नाही.
दरम्यान, दुसऱ्या पथकाने देवळाली प्रवरा येथील सुलोचना कोळसे यांच्या तक्रारीवरून सचिन सुरेश कोठुळे यांच्या राहत्या घरावर धाड टाकली. या ठिकाणी तपासणीदरम्यान करारनामे, चेक तसेच सावकारीसंदर्भातील विविध कागदपत्रे आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील खाजगी सावकारकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कारवाईच्या भीतीने काही सावकारांनी पलायन केल्याची चर्चा आहे.
या छापेमारीत गिरीश मुसळे, बाळासाहेब रासकर, सविता माने, पांडुरंग थोरवे, एफ. ए. शेख, सागर म्हसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बेकायदेशीर सावकारकीची माहिती द्या
तालुक्यात बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्यांची माहिती असल्यास सहाय्यक निबंधक कार्यालयास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात ११ नोंदणीकृत सावकार असून शासनाने त्यांच्यासाठी व्याजदर निश्चित केले आहेत. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी कर्जासाठी वित्तीय संस्था व बँकांचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी केले.

COMMENTS