कर्जत : कष्ट, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली अविचल निष्ठा यांना योग्य दिशेने परिश्रमांची जोड मिळाली, तर यशाला गवसणी घालता येते, हे कर्जतच्या सुपुत्

कर्जत : कष्ट, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली अविचल निष्ठा यांना योग्य दिशेने परिश्रमांची जोड मिळाली, तर यशाला गवसणी घालता येते, हे कर्जतच्या सुपुत्राने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत देशात ५७ वा क्रमांक मिळवत ‘असिस्टंट कमांडंट’पदावर झेप घेणारे प्रतीक गणेश जेवरे यांचा दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे यांचे सुपुत्र असलेल्या प्रतीक यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, विभागप्रमुख आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा क्षण ठरला.
यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे, कार्याध्यक्ष सुनील शेलार, खजिनदार प्रकाश धांडे, दीपक शिंदे, महादेव गांगर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतीक जेवरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रतीक जेवरे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली आणि ध्येय निश्चित करून सातत्याने चांगले परिश्रम घेतले, तर यश निश्चित मिळते. परिस्थिती कोणतीही असो, मनामध्ये जिद्द आणि ध्येय स्पष्ट असेल तर कोणतेही आव्हान पार करता येते.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी प्रतीक जेवरे यांच्या यशाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “कर्जतच्या मातीतील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मनात ठरविले आणि योग्य दिशेने प्रयत्न केले, तर तो कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवू शकतो. प्रतीक जेवरे यांच्या यशातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता अभ्यास, परिश्रम आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले, तर आभार प्रा. कडू यांनी मानले.

COMMENTS