कोपरगाव : रिझर्व्ह बँक व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि प्रभावी कर्जवसुलीच्या बळावर गौतम सहकारी बँकेने सहकार क्षेत्

कोपरगाव : रिझर्व्ह बँक व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि प्रभावी कर्जवसुलीच्या बळावर गौतम सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सन २०२५-२६ अखेर बँकेच्या ठेवी १४८ कोटी रुपये होत्या. त्यामध्ये सातत्याने वाढ होऊन आजमितीस बँकेच्या ठेवी १७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. सभासदांचा बँकेवरील विश्वास दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे हे द्योतक असून, एवढ्या ठेवींवर एवढा नफा कमावणारी गौतम सहकारी बँकेसारखी दुसरी बँक महाराष्ट्रात नाही, असे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले.
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गौतम सहकारी बँकेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (दि.८) रोजी गौतमनगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बँकेचे मार्गदर्शक तथा माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन संजय आगवण होते.यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार आशुतोष काळे बोलत होते.
गौतम सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, पुणे व संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये असून, नऊ शाखांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह विविध घटकांच्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करण्याचे काम बँक करीत आहे. आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याची पद्धत तसेच कर्जवसुलीवर असलेले विशेष लक्ष यामुळे बँकेचे आर्थिक कामकाज सक्षमपणे सुरू आहे.
प्रास्तविक करताना प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडतांना सांगितले की, आरबीआयचे कडक नियम, वाढती स्पर्धा आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात गौतम बँकेने यावर्षी ऐतिहासिक आणि भक्कम कामगिरी केली आहे. सर्व वित्तीय निकषांचे पालन करून व्यवसायात नवा टप्पा गाठत मिश्र व्यवसाय २०४ कोटीहून २३८ कोटीवर गेला आहे. बँकेकडे १४८ कोटीच्या ठेवी व कर्ज येणे ८९ कोटी ५६ लाख असून बँकेला यावर्षी ढोबळ नफा ०४ कोटी १४ लाख ०६ हजार झालेला आहे. त्यातून सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून निव्वळ नफा ०१ कोटी ३५ लाख ४८ हजार झाला आहे. तसेच मागील काही वर्षापासून बँकेचा निव्वळ एनपीए ०% असल्याचे सांगितले.
यावेळी आर्थिक वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव संचालक दत्तात्रय खेमनर यांनी मांडला.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषय पत्रिकेवरील १ ते १६ विषय मांडले त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली.

COMMENTS