नांदेड: शहरातील महावीर चौक परिसरात उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये ८० वर्षीय वृद्ध आणि एका महिलेचा झालेला अपघात महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभ
नांदेड: शहरातील महावीर चौक परिसरात उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये ८० वर्षीय वृद्ध आणि एका महिलेचा झालेला अपघात महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण ठरला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसानंतर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे उघड्या चेंबरचा अंदाज न आल्याने ८० वर्षीय जुगलकिशोर मोदी आणि एक महिला अचानक सात ते आठ फूट खोल चेंबरमध्ये कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही बाहेर काढल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे शहरातील रस्ते व सांडपाणी व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.
दरम्यान, महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र अनेक भागांत ही कामे अपूर्ण राहिल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या मध्यम स्वरूपाच्या पावसातच शहरातील अनेक प्रभागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. विविध विकासकामांसाठी खोदलेले रस्ते अद्याप पूर्ववत न केल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्यात पाणी साचत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकीस्वारांना बसत आहे. पाण्याखाली लपलेले खड्डे आणि उघडी चेंबर्स नागरिकांच्या जीवितासाठी थेट धोका निर्माण करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक दिलीपसिंग सोडी यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकार्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांचा प्रश्न आता स्पष्ट आहे—शंभर दिवसांच्या आराखड्यातील आश्वासने केवळ कागदावरच राहणार की शहरातील उघडी चेंबर्स, साचलेले पाणी आणि धोकादायक रस्त्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार? शहरात आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

COMMENTS