अहिल्यानगर: जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि औद्योगिकीकरणासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोट क्

अहिल्यानगर: जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि औद्योगिकीकरणासाठी अत्यंत लाभदायी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात आषाढसरींनी जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुळा नदीतील कोतूळ येथील पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून मुळा धरणात नव्याने पाण्याची विक्रमी आवक सुरू झाली आहे.
मंगळवारी रात्री पावसाने जोर धरल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग ८,०२८ क्युसेकपर्यंत वाढला होता, जो मंगळवारी सायंकाळी केवळ ३,२१२ क्युसेक इतका होता. त्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने नदीचा विसर्ग बुधवारी सायंकाळी थेट १७,२४३ क्युसेकपर्यंत पोहोचला. नंतर पावसाचा वेग काहीसा मंदावल्याने नदीतील विसर्ग १२,०४१ क्युसेकवर आला.
२६,००० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमता असलेल्या मुळा धरणात काल सायंकाळी एकूण पाणीसाठा १२,१७९ दलघफू झाला होता. पाणलोटातील पाण्याची आवक अशीच टिकून राहिल्यास आज या धरणातील एकूण पाणीसाठा निम्म्याहून अधिक (५० टक्क्यांपेक्षा जास्त) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; वीज पुरवठा खंडित
धो-धो पावसासोबत सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पावसामुळे अनेक शेतांचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पावसासोबत परिसरात कमालीचा गारठा वाढल्याने नागरिक गारठले असून जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.

COMMENTS