नाशिक: शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत राजकीय वातावरण

नाशिक: शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत राजकीय वातावरण प्रचंड तापले. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात खड्डे आणि चिखल वाचवताना ट्रकच्या धडकेत ४० वर्षीय नीलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या ५ महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेला हा ५ वा बळी ठरल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्यावरून मनपा मुख्यालयात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट थेट आमनेसामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
२८ जुलै रोजी घडलेल्या अपघातात घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या नीलेश कोतकर यांच्या ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीला आणि पत्नीला सोबत घेऊन शिंदे गटाच्या नगरसेविका किरण गामणे आणि स्थानिक नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. “शहरातील खड्ड्यांमुळे आज आमच्या कुटुंबात न भरून निघणारा खड्डा पडला आहे, तो प्रशासन कसा भरून काढणार? ५ वर्षांच्या मुलीचा उदरनिर्वाह कसा चालणार?” असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल कोतकर कुटुंबीयांनी उपस्थित केला.
आयुक्त दालनाबाहेर दोन्ही गटांत जुंपली
शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे पीडित कोतकर कुटुंबाला सोबत घेऊन मनपा आयुक्त मनीषा खात्री यांची भेट घेण्यासाठी आले होते. आयुक्त दालनात नसल्याने त्यांनी दूरध्वनीवरून कुटुंबीयांचा संवाद साधून दिला आणि बाहेर पत्रकारांशी बोलू लागले.
नेमक्या याच वेळी ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे हे आपल्या १५ नगरसेवकांसह मनपा मुख्यालयाच्या पायऱ्यांवरून आंदोलन करत तिथे पोहोचले. पोरजे यांनी तिदमे यांना थेट घेरले आणि “तुम्ही स्वतः सत्तेत आहात, तरीही तुम्हाला खड्ड्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावे लागत आहे? त्यापेक्षा आधी सत्तेतून बाहेर पडा; मग आपण दोघेही एकत्र रस्त्यावर उतरून या भ्रष्ट प्रशासनाविरोधात लढा देऊ,” असा रोखठोक सवाल केला. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली.
बाळा दराडेंच्या मध्यस्थीने वाद शांत
दोन्ही बाजूंचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने महापालिका परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर वाद विकोपाला जात असल्याचे पाहून बाळा दराडे यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या नेत्यांना शांत केले आणि पुढील अनर्थ टळला.

COMMENTS