राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून पुढील दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर

राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून पुढील दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात पावसाचा जोर; अमरावती, यवतमाळला रेड अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पुढील २४ तासांत पावसाचा जोर लक्षणीय वाढणार आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. १ ऑगस्टपासून विदर्भातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याला थेट रेड अलर्ट; सतर्कतेचे आदेश
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने थेट रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी झाडांचा किंवा विजेच्या खांबांचा आसरा न घेता सुरक्षित स्थळी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
गोंदियात भीषण वादळाचा तडाखा; ८ जण जखमी
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बांध परिसरात अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने मोठा धुमाकूळ घातला. या वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे आणि छत उडून गेले असून दुर्घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने गावात मोठे नुकसान झाले आहे.
कोकणात वाऱ्याचा वेग वाढला; रत्नागिरीला यलो अलर्ट
दुसरीकडे कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक दिसून येत आहे. अरबी समुद्रात किनारपट्टी भागात ताशी ४० ते ४५ किमी वेगाने वारे वाहत असून जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

COMMENTS