Homeताज्या बातम्या

पोलीस मुख्यालय-विठ्ठल चौक रस्त्याची दुरवस्था; 13 ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

बीड : शहरातील पोलीस मुख्यालय ते विठ्ठल चौक, अंकुश नगर (जुना चराटा रोड) या प्रमुख रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था तात्काळ दूर कर

आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
८० मोजा आणि पाणी प्या! किनवटमध्ये दुधाच्या दरवाढीसोबत भेसळीचा ’धंदा’ जोरात; अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत?
विजेच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत; महावितरणच्या गलथान कारभारावर ग्रामस्थ संतप्त

बीड : शहरातील पोलीस मुख्यालय ते विठ्ठल चौक, अंकुश नगर (जुना चराटा रोड) या प्रमुख रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था तात्काळ दूर करून नवीन रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी अंकुश नगर कृती समिती आक्रमक झाली आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास 13 ऑगस्ट 2026 रोजी जीवा महाले चौक, नगर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. पोलीस मुख्यालय ते विठ्ठल चौक हा परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन वापरातील प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक वाहनांच्या वाहतुकीवरही याचा परिणाम होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती अथवा नवीन कामासाठी संबंधित विभाग, नगर परिषद तसेच प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे रस्त्याच्या नवीन कामास तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, तसेच याबाबत समितीला लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासन व नगर परिषदेकडून ठोस कार्यवाही किंवा लेखी आश्वासन न मिळाल्यास 13 ऑगस्ट रोजी जीवा महाले चौक, नगर रोड येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर, शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर, रमेश चव्हाण, साहस आदोडे, करण परदेशी, संजय चव्हाण आणि निलेश राजमल उपाध्याय यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

COMMENTS