बेलापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना न

बेलापूर : बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने ही मुदत मंजूर केली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांचे पती यांचा समावेश आहे. श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग समोर आला असून हे दोघे पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांनी गर्भलिंगनिदानासाठी वापरले जाणारे मशीन यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या गर्भवती महिलांचे गर्भलिंगनिदान करण्यात आले होते, त्यांची ओळख पटवून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही महिलांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी तिघींचे गर्भपात झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हे गर्भपात अटक आरोपींच्या दवाखान्यात काही एजंटांच्या मदतीने करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक एजंट सक्रिय असल्याचे तपासातून उघड झाले आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांच्या ताब्यातील सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान केले जात होते. यासाठी संबंधित डॉक्टरला प्रत्येकी दहा हजार रुपये मिळत होते, तर एजंटांना प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जात होते. एजंटांची संख्या अधिक असल्यास त्यानुसार रकमेची मागणीही वाढवली जात होती.
तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजंट आठ ते दहा गर्भवती महिलांचा गट तयार करून ठराविक दिवशी व वेळेत त्यांना बोलावत असत. महिलांसोबत त्यांचे पती किंवा नातेवाईकही येत असत. संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जात होती. त्यानंतर नातेवाईकांना एका ठिकाणी थांबवून एजंट गर्भवती महिलांना चारचाकी वाहनातून दुसर्या गुप्त ठिकाणी घेऊन जात असत. तेथे गर्भलिंगनिदान चाचणी केली जात होती. चाचणीनंतर महिलांना पुन्हा त्यांच्या नातेवाईकांकडे आणून सोडण्यात येत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

COMMENTS