तहसीलदार खोमणे यांचा मनमानी कारभार थांबवा; गावकऱ्यांसह भाविकांची मागणी चकलांबा : पुरुषोत्तम अधिक मास सुरू असल्याने साडेतीन पीठांपैकी एक मानल्य

तहसीलदार खोमणे यांचा मनमानी कारभार थांबवा; गावकऱ्यांसह भाविकांची मागणी
चकलांबा : पुरुषोत्तम अधिक मास सुरू असल्याने साडेतीन पीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे दररोज हजारो भाविक शनिदर्शनासाठी दाखल होत आहेत. मात्र, या काळात परिसरात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाळूने भरलेले ट्रक आणि हायवा वाहनांचा वेग प्रचंड वाढल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा या भरधाव वाहनांमुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः वृद्ध, महिला व लहान मुलांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अधिक मासासारख्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या कालावधीत श्रीक्षेत्र परिसरातील वाळू उपसा आणि वाहतूक तात्पुरती बंद ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य का दिले जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्यात इतरत्र नियोजनबद्ध पद्धतीने वाळूचे वितरण करता येत असताना, केवळ धार्मिक स्थळालगतच उपसा का सुरू ठेवला आहे, यावरून तहसीलदार खोमणे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
भाविकांच्या प्रमुख मागण्या:
- अधिक मास संपेपर्यंत श्रीक्षेत्र राक्षसभुवन परिसरातील वाळू वाहतूक पूर्णपणे बंद करावी.
- शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष वाहतूक नियोजन करावे.
- धार्मिक स्थळ परिसरात भरधाव हायवा व ट्रक वाहतुकीवर कडक नियंत्रण आणावे.
- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा.

COMMENTS