गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि

गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी, उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि तलावातील पाण्याचा होणारा अनियंत्रित उपसा यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने गावच्या मुख्य तलावातील पाणी उपशावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सरपंच प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर आणि ग्रामविकास अधिकारी श्री. शेंडेकर यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन तलावातील पाणी केवळ पिण्यासाठी आणि जनावरांच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत सरपंच प्रियंका ताई खेडकर यांनी तलाव वाचला तर गाव वाचेल या भूमिकेतून गावातील पाणीसाठा जपण्याची गरज स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज घेतलेला निर्णय हा केवळ वर्तमानासाठी नसून भविष्यातील पिढीचा विचार करून घेतलेला आहे. ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांनी प्रशासनाच्या वतीने निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या. त्यांनी स्पष्ट केले की, तलावातील पाणी शेतीसाठी, बांधकामासाठी किंवा टँकरद्वारे विक्रीसाठी वापरण्यास सक्त मनाई राहील. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही काळात तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्यामुळे भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. अनेक वेळा रात्रीच्या वेळी पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय गावाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतीने तरुणांचे विशेष गस्त पथक तयार केले असून 24 तास लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणीही नियम मोडून पाणी उपसा करताना आढळल्यास मोटारपंप, पाईप तसेच संबंधित साधने जप्त करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून सरपंच प्रियंका ताई खेडकर आणि ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांचे आभार मानले आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे काम केल्यास गावातील मोठ्या समस्या सोडवता येतात, याचे चकलांबा ग्रामपंचायत हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते शरद खेडकर यांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, पाण्यासारख्या गंभीर विषयावर वेळीच कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. चकलांबा ग्रामपंचायतीने घेतलेले पाऊल इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल. चकलांबा ग्रामपंचायतीचा हा ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ उपक्रम आता बीड जिल्ह्यात जलसंवर्धनाचा आदर्श पॅटर्न म्हणून चर्चेत आला आहे.

COMMENTS