Homeताज्या बातम्या

बीडमध्ये ’ड्राय पोर्ट’ अन् ’लॉजिस्टिक पार्क’ उभारणीचा मार्ग सुकर

बीड : मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बीड जिल्ह्यात औद्योगिक अन् कृषी विकासाला गती देण्यासाठी ’इनलँड ड्राय पोर्ट’ आणि आधुनिक लॉजिस्टिक प

अमृतसर एक्सप्रेसच्या डब्यात सापडलेल्या मानवी पायाचे गूढ १० दिवसांनंतरही कायम; जीआरपीकडून तपास सुरु
राज्यात पुढील २४ तास मुसळधार पावसाचे! पुणे, सातारा घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’; धुळ्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी
NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड : मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बीड जिल्ह्यात औद्योगिक अन् कृषी विकासाला गती देण्यासाठी ’इनलँड ड्राय पोर्ट’ आणि आधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या हालचालींना केंद्र पातळीवर गती मिळण्याची चिन्हं आहेत. यासंदर्भात खा.बजरंग सोनवणे प्रयत्नशील असून त्यांनी केलेल्या निवेदनावर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक दखल घेत, पुढील कारवाईसाठी हे पत्र संबंधित विभागाकडे पाठवल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.

बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, डाळिंब यांसह इतर कृषी उत्पादनांचे मोठे उत्पादन होते. तसेच जिल्ह्यात कृषी आधारित व लघु उद्योगांच्या विकासाला मोठा वाव आहे. मात्र, अत्याधुनिक लॉजिस्टिक आणि निर्यात सुविधा अभावी स्थानिक शेतकरी, व्यापारी व उद्योजकांना मोठा वाहतूक खर्च सोसावा लागतो आणि वेळही वाया जातो. बीड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान मराठवाड्याच्या मध्यभागी असल्याने येथे ’ड्राय पोर्ट’ व लॉजिस्टिक पार्क उभारल्यास कंटेनर वाहतूक, वेअरहाउसिंग, कोल्ड स्टोरेज आणि पॅकेजिंग सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील, स्थानिक शेतीमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे सुलभ होईल, संपूर्ण मराठवाड्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळून स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या सर्व बाबींचा विचार करून बीडमध्ये ड्राय पोर्ट आणि लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मंजुरी द्यावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे 1 ऑगस्ट 2026 रोजी पत्राद्वारे केली होती. खा.सोनवणे यांच्या पत्राची तातडीने दखल घेत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी उत्तर पाठवून, या मागणीवर योग्य त्या कारवाईसाठी हे प्रकरण संबंधित विभागाकडे वर्ग (फॉरवर्ड) करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे बीडमधील बहुप्रतिक्षित ड्राय पोर्ट आणि लॉजिस्टिक पार्कच्या प्रकल्पाला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या आर्थिक चित्राला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS