केज : केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नदी-तलावातील पाण्याच्या मोटारी व त्यांचे वायर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्ह

केज : केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नदी-तलावातील पाण्याच्या मोटारी व त्यांचे वायर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केज, माजलगावसह बीड जिल्ह्यात तसेच परभणी व जालना जिल्ह्यातही मोटार व वायर चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मध्यप्रदेशातील काही इसम रुद्राक्ष विक्रीच्या बहाण्याने गावोगावी रेकी करत असल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी हेच इसम चिन्हांकित ठिकाणांवरून मोटार व वायर चोरी करत असल्याची माहिती मिळाली. आरोपी सध्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच एलसीबी पथक तत्काळ नांदगाव येथे रवाना झाले. तेथे शोध घेऊन धर्मेंद्र सुक्कल पारधी (वय 25, रा. विलेगे बुठा, जि. कटनी, मध्यप्रदेश), शेख शफिक शेख बाबू (वय 25, रा. माजलगाव, जि. बीड) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या आरोपींनी केज व माजलगाव उपविभागातील विविध ठिकाणांहून इतर 8 साथीदारांच्या मदतीने वायर व मोटार चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली व अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यांना केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित फरार 8 आरोपींचा आणि चोरी गेलेल्या मुद्देमालाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच एलसीबी पथकातील कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

COMMENTS