सातारा : शिक्षण विभागाने ऑनलाईन पद्धतीने इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले आहे. मात्र, या नियोजनातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्या

सातारा : शिक्षण विभागाने ऑनलाईन पद्धतीने इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले आहे. मात्र, या नियोजनातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याऐवजी नेट कॅफे चालकांसह राज्य शासनाचे उखळ पांढरे होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश होवो अथवा न होवो, शासनाला १०० रुपये तर नेट कॅफे चालकाला २०० रुपये असा ‘मलिदा’ मिळू लागला आहे. या क्लिष्ट ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिक्षण विभागाने ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २० ते २२ मे या कालावधीत अर्जाचा ‘भाग १’ व ‘भाग २’ भरण्याची मुदत दिली होती. मात्र, पहिल्याच दिवसापासून शिक्षण विभागाची वेबसाईट ठप्प झाल्याने तक्रारी वाढल्या. त्यानंतर प्रशासनाने ही मुदत आधी २३ मे आणि आता पुन्हा बदल करून २५ मे पर्यंत वाढवली आहे.
हेल्पलाईन नंबरही मिळेनात, पालक संभ्रमात! ऑनलाईन अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळालेला ‘युझर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ इनव्हॅलिड (Invalid) असल्याचा संदेश येत आहे. त्रस्त पालकांनी सुविधा केंद्रांचे दरवाजे ठोठावले, मात्र तिथूनही ५०-५० वेळा फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही प्रवेश निश्चित होईल की नाही, याची कोणतीही शाश्वती नसल्याने यंदा ११ वीचे प्रवेश कसे होणार? असा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

COMMENTS