शिर्डी : जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा संस्थानच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून संस्थानला वर्षभरात ६३८ कोटी रुपयांचे

शिर्डी : जगप्रसिद्ध शिर्डी साईबाबा संस्थानच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा लेखाजोखा समोर आला असून संस्थानला वर्षभरात ६३८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात सुमारे १० कोटी रुपयांची घट झाली असली, तरी सोन्या-चांदीच्या देणगीत मात्र लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
संस्थानच्या आर्थिक अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न ६४८ कोटी रुपये होते, ते २०२५-२६ मध्ये ६३८ कोटी रुपयांवर आले आहे. मात्र, यावर्षी रुग्णालये व इतर इमारतींसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचे वस्तुरूपातील मोठे दान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या देणगीचा विचार केल्यास संस्थानला मिळालेल्या एकूण योगदानात वाढ झाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या सोने-चांदीच्या देणगीत यंदा मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये सोने-चांदी स्वरूपातील देणगी १३ कोटी ९५ लाख रुपये होती, ती २०२५-२६ मध्ये वाढून १९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या कालावधीत भाविकांनी सुमारे १६ किलो सोने आणि १९७ किलो चांदी साईचरणी अर्पण केली. याशिवाय संस्थानच्या मुदत ठेवींवरील व्याज उत्पन्नातही सुमारे १४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एकूण दान (२०२५-२६) :
- एकूण उत्पन्न : ६३८ कोटी रुपये
- सोने-चांदी दान : १९ कोटी रुपये
- प्राप्त सोने : १६ किलो | प्राप्त चांदी : १९७ किलो
संस्थानच्या एकूण मुदत ठेवी व साठा :
- एकूण मुदत ठेवी : ३,६०३ कोटी रुपये
- संस्थानकडील एकूण सोने : ५५० किलो
- संस्थानकडील एकूण चांदी : ७,०३० किलो

COMMENTS