Homeताज्या बातम्या

पुण्यात २५ लाखांहून अधिक मतदार वगळण्याची शक्यता; मृत, दुबार, स्थलांतरित आणि अनुपस्थित मतदारांचा समावेश

पुणे : पुणे जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या प्रक्रियेदरम्यान वितरीत करण्यात आलेल्या २५ लाखांहून

‘एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम’; बीडमध्ये ३१ जुलैला गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन
आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून संघर्ष आणि परिवर्तनाची प्रेरणा: प्रा. डॉ. मनोहर सिरसाट
पत्रकार सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन
नऊ महिन्यांत वगळले १ लाख ३२ हजार मतदार..! Pune Marathi News | pune news 1  lakh 32 thousand voters excluded in nine months | Latest Pune News at  Lokmat.com

पुणे : पुणे जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या प्रक्रियेदरम्यान वितरीत करण्यात आलेल्या २५ लाखांहून अधिक अर्जांचे संकलन होऊ शकलेले नाही. मृत, दुबार नोंद असलेले, स्थलांतरित तसेच प्रत्यक्ष ठिकाणी आढळून न आलेले मतदार अशा विविध कारणांमुळे हे अर्ज “संकलन न झालेली” या वर्गवारीत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम मतदारयादीत या मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर संकलन न झालेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी स्वतःचे तसेच कुटुंबातील सदस्यांचे नाव या यादीत आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. नाव वगळले जाण्याची शक्यता असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात मतदार पडताळणी मोहिमेअंतर्गत एकूण ८७ लाख ९६ हजार ६२४ अर्जांचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ५१ लाख ५० हजार ४८० अर्जांची संगणकीय नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र, उर्वरित २५ लाखांहून अधिक अर्जांचे संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे या मतदारांच्या नोंदींची अंतिम पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. संकलन न झालेल्या अर्जांमध्ये प्रामुख्याने पाच प्रकारच्या मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मृत मतदार, एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असलेले दुबार मतदार, अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले मतदार, अर्जावर स्वाक्षरी करण्यास तयार नसलेले मतदार आणि घरच्या पत्त्यावर उपलब्ध नसलेले मतदार यांचा समावेश आहे. मतदाराचा प्रत्यक्ष ठावठिकाणा उपलब्ध न होणे किंवा अर्ज स्वीकारण्यास संबंधित व्यक्तीने नकार देणे, अशा कारणांमुळे हे अर्ज जमा करता आले नसल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता हडपसर मतदारसंघात सर्वाधिक २ लाख ८७ हजार ४५० अर्ज संकलित झालेले नाहीत. त्यानंतर खडकवासला मतदारसंघात २ लाख ४५ हजार ६८३, तर वडगाव शेरी मतदारसंघात २ लाख १० हजार ३२० अर्ज या वर्गवारीत आहेत. कसबा पेठ मतदारसंघात ४६ हजार ७२४ अर्ज संकलित झालेले नसल्याची नोंद आहे. अंतिम यादीपूर्वी मतदारांनी तपासणी करणे आवश्यक. विशेष सखोल पडताळणीनंतर अंतिम मतदारयादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे संकलन न झालेल्या अर्जांच्या वर्गवारीत नाव आढळणाऱ्या मतदारांनी ते आपलेच नाव आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. नाव वगळले जाण्याची शक्यता असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधणे महत्त्वाचे ठरणार आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित नोंदींची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याने पात्र मतदारांचे नाव मतदारयादीत कायम राहण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

COMMENTS