मुंबई : राज्य सरकारने मुंबईकरांसाठी असलेली दहीहंडीची सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी आता रक्षाबंधनासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी क

मुंबई : राज्य सरकारने मुंबईकरांसाठी असलेली दहीहंडीची सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी आता रक्षाबंधनासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे ५ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली गोपाळकाला अर्थात दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी यंदा रक्षाबंधनची स्थानिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. हा निर्णय मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. यासोबतच भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब झाल्यास संबंधित द्यावयाच्या व्याजदराच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना कायद्यातील कलम ७२ मध्ये बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपन्या किंवा विशेष प्रयोजन वाहनांमधील अंतर्गत जमीन हस्तांतरण व्यवहारांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात २५ टक्के सवलत देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार चार नवीन पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन, ॲग्रिटेक, सांख्यिकी तसेच माहिती व तंत्रज्ञांशी संबंधित पदांचा समावेश आहे. ॲग्रिटेकसाठी अपर संचालक पदालाही मंजुरी देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री नीलकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी सुमारे १८ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात येणार आहे. स्वयं-अर्थसहाय्यित पद्धतीने खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्यासंदर्भातील नियम आणि मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली. गडचिरोलीतील आश्रमशाळेचा परवाना कायमचा रद्द गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत झोपले असताना सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर आणखी एका विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित आश्रमशाळेच्या व्यवस्थेबाबतही नाराजी व्यक्त केली. शाळेत आवश्यक शिक्षक आणि वॉर्डन उपलब्ध नसतील, तसेच शासनाकडून अनुदान मिळूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा दिल्या जात नसतील, तर याची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

COMMENTS