नांदेड : नांदेड शहरातील सांगवी प्रभाग क्रमांक ३ मध्ये महापालिकेच्या वतीने चालविली जाणारी सीबीएसई शाळा सुरू करण्याची आग्रही करणाऱ्या नगरसेविका मिन
नांदेड : नांदेड शहरातील सांगवी प्रभाग क्रमांक ३ मध्ये महापालिकेच्या वतीने चालविली जाणारी सीबीएसई शाळा सुरू करण्याची आग्रही करणाऱ्या नगरसेविका मिनल गजानन पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून नांदेड मनपाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या वार्षिक अंदाज पत्रकात शाळेच्या उभारणीला मान्यता देत मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील सांगवी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत विकासकामांना गति देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेविका मिनल गजानन पाटील यांनी सुरू ठेवला आहे. शिक्षण, आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा या विषयांना प्राधान्य देत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या पार पडलेल्या मागील दोन्ही सर्वसाधारण सभेमध्ये मिनल पाटील यांनी सांगवी परिसरामध्ये सीबीएसई शाळेची गरज अधोरेखित केली होती. त्याला अनुसरून महापालिकेने या भागात शहरातील व मराठवाड्यातील कोणत्याही महानगर पालिकेकडून चालविली जाणारी पहिली सीबीएसई शाळा कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे, सांगवी येथील मनपाच्या मालकीच्या जागेत सदरील शाळा उभारली जाणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून यासंदर्भातील ठराव मंजूर करून घेण्यातही नगरसेविका मिनल पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. याबद्दल या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय विठ्ठलनगर परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे आणि स्थानिक नागरिकांसाठी कर्मवीर नगर येथे महापालिकेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठीही मोठी आर्थिक तरतूद देखील वार्षिक अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. शिक्षणासाठी पोषक वातावरण आणि नागरिकांसाठी सुलभ आरोग्यसेवा ही विकसित प्रभागाची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये असली पाहिजेत, या भूमिकेतून मिनल पाटील पाठपुरावा करीत आहेत. प्रभागातील प्रश्न केवळ सभागृहापुरते मर्यादित न ठेवता प्रशासनाशी समन्वय साधून त्यांची अंमलबजावणी करण्यावर माझा भर असून आंतरराष्ट्रीय दर्जाची सीबीएसई शाळा उभारण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न असणार असून माझ्या मागणीला मान्यता दिल्याबद्दल महापौर महोदया कविता ताई मुळे व संपूर्ण मनपा सभागृहाचे आभार मानते, अशी आनंदी भूमिका देखील नगरसेविका मिनल पाटील यांनी यावेळी मांडली.

COMMENTS