Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

शाळेतील मैत्रीने उभी केली सामाजिक मदतीची भक्कम भिंत‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’च्या वतीने 30 हजार रुपयांची मदत

अकोले : शाळेतील मैत्री केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्य

कोतुळ सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराच्या वसुलीचे आदेश
अकोलेत युरियाचा ३३५ टन बफर साठा उपलब्धग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश; ५१ कृषी सेवा केंद्रांवर वितरण सुरू
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना


अकोले : शाळेतील मैत्री केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्या 1997-98 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. या मित्रमंडळींनी एकत्र येत ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला असून, मित्रांच्या कुटुंबीयांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. नुकतीच या उपक्रमांतर्गत तिसरी मदत सुपूर्द करण्यात आली.
या गटातील सर्व सदस्य दरमहा 500 रुपयांची बचत करतात. तसेच वाढदिवस साजरे करण्यावर होणारा खर्च टाळून प्रत्येक सदस्य वाढदिवसानिमित्त आणखी 1 हजार रुपये गटात जमा करण्याचा संकल्प करत आहे. या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा गटाचा उद्देश आहे. या निधीतून गटातील सदस्यांच्या मुला-मुलींचे विवाह, शिक्षण किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय अडचणींसाठी आर्थिक आधार दिला जात आहे. गटातील सदस्य धोंडू तुकाराम बेनके यांच्या कन्या दिव्या हिच्या विवाहानिमित्त ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’च्या वतीने 30 हजार रुपयांची मदत आपुलकीने देण्यात आली. मित्राच्या मुलीचे लग्न म्हणजे आपल्या घरचेच कार्य या भावनेतून सर्व मित्रांनी या आनंदाच्या क्षणी सहभाग नोंदवला.
केवळ विवाहकार्यापुरतेच नव्हे, तर एखाद्या मित्रावर उपचाराची वेळ आल्यास किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज भासल्यास, या निधीतून तातडीची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात अशा प्रकारची सामूहिक मदत अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरत आहे. अगस्ती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याचे आणि अनोख्या बचत गटाचे समशेरपूर परिसरात तसेच शिक्षकवर्गातून विशेष कौतुक होत आहे. या उपक्रमात अध्यक्ष रामदास बेनके, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत उघडे, सचिव राम कोतवाल यांच्यासह अमजद शेख, प्रा. आशिष तळेकर, नंदू मंडलिक, भिवा सदगीर, अरुण बेनके, विलास दराडे, राहुल बेनके, दीपक जगताप, रामचंद्र मेंगाळ, किसन मोखरे, बंडू सदगीर, संतोष भालेराव, सुबोध भोसले, खंडू ढोन्नर, तुकाराम मोखरे, बहिरु सदगीर, संपत सहाणे, देवराम घोडसरे, निवृत्ती ढोन्नर, संतोष मंडलिक, गोरक्ष आव्हाड, जमील शेख, मधुकर बेनके, दीपक शिंदे, धोंडीराम बेनके, शिवाजी बिन्नर आदी माजी विद्यार्थी सक्रिय सहभागी झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचे काम हा गट करत आहे.

COMMENTS