कर्जत: जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प गंभीर मनुष्यबळाच्या संकटातून ज
कर्जत: जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प गंभीर मनुष्यबळाच्या संकटातून जात आहे. या विभागात पर्यवेक्षिकांची (सुपरवायझर) १२ मंजूर पदे असताना सध्या केवळ ३ पर्यवेक्षिका कार्यरत असल्याने तब्बल ३६० अंगणवाड्या, ३६० सेविका आणि ३४५ मदतनीस यांच्या कामाचा प्रचंड भार या तीन अधिकाऱ्यांवर पडला आहे. त्यामुळे शासनाच्या महिला व बालकल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे.
एका पर्यवेक्षिकेवर १२५ अंगणवाड्यांची जबाबदारी
नियमाप्रमाणे एका पर्यवेक्षिकेकडे २० ते २५ अंगणवाड्यांचे पर्यवेक्षण असणे अपेक्षित असताना, कर्जतमध्ये एका पर्यवेक्षिकेकडे तब्बल १२५ अंगणवाड्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, तपासण्या, मार्गदर्शन आणि योजनांचे प्रभावी निरीक्षण करणे अशक्यप्राय झाले आहे. पर्यवेक्षिकांवर केवळ अंगणवाड्यांचे पर्यवेक्षणच नसून पोषण आहाराची तपासणी, ट्रॅकर प्रणालीवरील ऑनलाइन नोंदी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेख लाडकी योजना, मासिक प्रगती अहवाल, विविध शासकीय पोर्टलवरील माहिती भरणे, तसेच जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या तातडीच्या सूचनांची अंमलबजावणी अशा असंख्य जबाबदाऱ्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मासिक अहवालातील साडेपाचशेहून अधिक कॉलम भरावे लागतात.
नव्या भरतीतूनही कर्जत उपेक्षितच
विशेष म्हणजे, नुकतीच जिल्हा परिषदेमार्फत सहा नव्या पर्यवेक्षिकांची भरती तसेच अनुकंपा तत्त्वावरही नियुक्ती करण्यात आली. मात्र या भरतीतून कर्जत तालुक्याला एकही पर्यवेक्षिका मिळालेली नाही, ही बाब अत्यंत आश्चर्यकारक आणि संतापजनक मानली जात आहे.
कर्जत तालुक्यावरच हा अन्याय का?
एवढी रिक्त पदे असूनही कर्जत येथील या प्रकल्पातील पर्यवेक्षिकांनी अतिशय उत्कृष्ट काम करत मागील वर्षी जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पर्यवेक्षकांची संख्या जवळपास पूर्ण असताना कर्जत तालुक्याला नवीन भरतीत डावलून हा अन्याय का केला जात आहे, असा सवाल आता नागरिक व कर्मचारी वर्गातून विचारला जात आहे.

COMMENTS