माजलगाव : नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान’ योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे

माजलगाव : नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान’ योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. संबंधित अभियंता, मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर शहराच्या विकासाऐवजी जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मनूर रोड व नवीन कब्रस्तान रोडवरील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्ते तयार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तडे जाणे, काँक्रीट उखडणे, चिरे पडणे अशा समस्या समोर आल्या आहेत. भर उन्हाळ्यात योग्य पद्धतीने पाणी न मारता कामे केल्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता घसरली असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे काम पूर्ण की फक्त बिल पूर्ण? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याशिवाय गटारी व नाल्यांची कामेही अत्यंत खराब दर्जाची झाल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी अर्धवट, वाकडी-तिकडी आणि नियमबाह्य पद्धतीने कामे करण्यात आली आहेत. सिमेंटमध्ये भेसळ, वाळूऐवजी डस्ट-पावडरचा वापर, तसेच निकृष्ट खडी वापरल्याने संपूर्ण प्रकल्पच संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकारांचे व्हिडिओ पुरावे समोर येऊनही संबंधित अधिकारी व पदाधिकारी मौन बाळगत असल्याने या प्रकरणात वरपर्यंत साखळी आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची भूमिकाही संशयास्पद असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, या कामांची तात्काळ थर्ड पार्टी चौकशी करण्यात यावी, काँक्रीट क्यूब टेस्ट घ्यावी तसेच वापरलेल्या सिमेंट, वाळू व खडीचे गुणवत्ता अहवाल जाहीर करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा समाजवादी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निकृष्ट कामांची बिले तातडीने थांबवून संबंधित अभियंता, मुख्याधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS