बीड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार व प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राज

बीड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार व प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज (२३ जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी बीड जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नसून देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, न्याय आणि भावी पिढीच्या भविष्याशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने उभे राहून महाराष्ट्र बंदला सहकार्य करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS