श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही किराणा दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक, पॅकिंगची तारीख आणि बॅच क्रमांक नमू

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही किराणा दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक, पॅकिंगची तारीख आणि बॅच क्रमांक नमूद नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याची चर्चा सुरू असून, अन्न व औषध प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
समोर आलेल्या चहाच्या पॅकेटवर एक नाव असून, चहाच्या पॅकेटवर ‘पॅकिंग केल्यापासून एक वर्षापर्यंत वापरण्यास योग्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पॅकिंग नेमके कोणत्या दिवशी करण्यात आले, याची तारीखच नमूद करण्यात आलेली नाही. तसेच बॅच क्रमांक, पॅकिंगचा महिना व वर्ष यासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली असली तरी ती रिकामी असल्याचे आढळून आले आहे.
सदर पॅकेटवर पॅकेजिंग करणाऱ्या संस्थेचे नाव व अन्न सुरक्षा परवाना क्रमांक छापण्यात आला आहे. मात्र, उत्पादनाची वैधता तपासण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत माहितीच नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांना उत्पादनाची वैधता तपासण्यासाठी आवश्यक असलेली माहिती नसल्याने या उत्पादनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रत्येक खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर उत्पादन दिनांक, तुकडी क्रमांक, वापरण्याची अंतिम मुदत किंवा वापरण्याचा कालावधी स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित उत्पादनावर नियमांचे पालन झाले आहे का, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अशा प्रकारची उत्पादने विक्रीस आहेत का, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, तुकडी क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन ग्राहक संघटनांनी केले आहे.

COMMENTS