नांदेड : नायगाव शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अस्वच्छता, शिळ्या अन्नपदार्थांची विक्री तसेच वर्तमान

नांदेड : नायगाव शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अस्वच्छता, शिळ्या अन्नपदार्थांची विक्री तसेच वर्तमानपत्राच्या कागदावर खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकार अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारे आहेत. वर्तमानपत्राच्या शाईतील रासायनिक घटक आरोग्यासाठी घातक असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरीही काही व्यावसायिक नफ्याच्या हव्यासापोटी नियमांची पायमल्ली करत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक तपासणी मोहीम सुरू केली असली तरी या कारवाया सातत्यपूर्ण आणि प्रभावी होणे गरजेचे आहे. केवळ अधूनमधून तपासण्या करून परिस्थितीत बदल होणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकतेनुसार परवाने निलंबित करण्यासारखी कठोर पावले उचलल्यासच अन्नसुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होईल. अन्न हा आरोग्याचा पाया असल्याने नागरिकांनीही स्वच्छतेबाबत सजग राहून संशयास्पद ठिकाणी अन्न सेवन टाळावे. तसेच गैरप्रकार आढळल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करून जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावावी. नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाची कठोर अंमलबजावणी यांची सांगड घातल्यासच नायगावकरांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होईल. अन्यथा अन्नसुरक्षेचे नियम केवळ कागदावरच राहतील आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ सुरूच राहील.

COMMENTS