अहिल्यानगर : पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा सुरू होत असून, यामुळे साईभक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. क

अहिल्यानगर : पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा सुरू होत असून, यामुळे साईभक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन बुधवार (१७ जून) रोजी करण्यात आले.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. पुण्याहून मिळालेल्या या पहिल्या थेट रेल्वे सुविधेमुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुणे–शिर्डी थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले असून नवीन रेल्वेमार्ग, आधुनिक स्थानके, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या आणि प्रवाशांसाठी वाढलेल्या सुविधा यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत आहे. पुणे–शिर्डीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर थेट रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यामागे केंद्र सरकारची विकासाभिमुख भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यावर विशेष भर दिला जात आहे. पुणे–अहिल्यानगर–शिर्डी रेल्वेसेवा ही त्याच दृष्टिकोनाचा भाग असून यामुळे भाविक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे नेटवर्कच्या विस्तारामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून विकसित भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS