Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

महाराष्ट्रातून स्वच्छ ऊर्जेला नवे बळअणुऊर्जा क्षेत्रात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मितीसाठी व

देवेंद्र फडणवीस : ‘भाजप’ला महाराष्ट्रव्यापी करणारे अद्वितीय संघटक!
पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा देवून हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार शोधा – वैभव स्वामी
नाशिक त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण


मुंबई : देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात अणुऊर्जा निर्मितीसाठी विविध आघाडीच्या उद्योगसमूहांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून, या माध्यमातून राज्यात तब्बल 25 हजार 400 मेगावॅट स्वच्छ ऊर्जानिर्मिती होणार आहे. यासोबतच सुमारे एक लाख तेवीस हजारांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अणुऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या वेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच विविध उद्योगसमूहांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी प्रदूषणमुक्त आणि संपन्न ऊर्जा व्यवस्थेचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. अणुऊर्जा ही भविष्यातील महत्त्वाची ऊर्जा मानली जात असून, या क्षेत्रातील गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीलाही चालना देणार आहे. या करारांमध्ये राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी ऊर्जा समूह, रिलायन्स उद्योग समूह आणि बजाज समूहाशी संबंधित ललितपूर ऊर्जा निर्मिती कंपनीचा समावेश आहे. अदानी ऊर्जा समूह राज्यात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सहा हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे सुमारे बारा हजार रोजगार उपलब्ध होऊ शकतात. रिलायन्स उद्योग समूहाकडून दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, सात हजार दोनशे मेगावॅट ऊर्जानिर्मिती होणार आहे. या माध्यमातून एक लाखांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, सात हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामधून सुमारे पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. बजाज समूहाशी संबंधित ललितपूर ऊर्जा निर्मिती कंपनी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून पाच हजार मेगावॅट ऊर्जानिर्मिती होऊन सुमारे तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात एकूण साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मितीत राज्य देशात अग्रस्थानी राहील, असा विश्‍वास शासनाने व्यक्त केला आहे.
तब्बल सव्वा लाख रोजगार निर्मिती
राज्यात येणार्‍या या गुंतवणुकीमुळे केवळ ऊर्जा निर्मितीच वाढणार नाही, तर 1,23,500 रोजगार निर्मिती होऊन स्थानिक उद्योगांना देखील चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्यांची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी संबंधित कंपन्यांनी प्रकल्पस्थळांचे तातडीने सर्वेक्षण सुरू करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

COMMENTS