Homeताज्या बातम्या

आश्रमशाळांतील कथित भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी

बीड: बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणार्‍या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचार्‍यांच्या

दिवाळीनिमित्त मिळणार शंभर रुपयांचा शिधा
हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
गुलाबराव उगले यांची जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

बीड: बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणार्‍या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचार्‍यांच्या शारीरिक व मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक व त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आदी पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने आश्रमशाळा ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’प्रमाणे चालवल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. गणेश ढवळे यांनी केला.

आंदोलनातील मुख्य मागण्या:

  • सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट व ऑनलाइन हजेरी: आश्रमशाळांमधील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ऑनलाइन हजेरी सुरू करावी, तसेच सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय समितीकडून विशेष ऑडिट करण्यात यावे.
  • अंथरवणपिंप्री तांडा प्रकरणाची चौकशी: गेवराई तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा विष्णू चव्हाण यांना कायदेशीर वेतनाची मागणी केल्यामुळे मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या पतीवर संस्थेच्या सचिवांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
  • वडझरी आश्रमशाळेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी: पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील आश्रमशाळेत पटसंख्येबाबत अनियमितता, शिक्षक मान्यतेतील कथित नियमभंग, वेतन अपहार व शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
  • सहाय्यक संचालकांवर कारवाईची मागणी: संस्थाचालकांची कथित पाठराखण करून कारवाईस विलंब केल्याचा आरोप करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बीड येथील सहाय्यक संचालकांवर प्रशासकीय कारवाई करून संबंधित प्रकरणांची तटस्थ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, हनुमान घोडके, किष्किंधा पांचाळ, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ बीड), नितीन जायभाये (अध्यक्ष, बीड शहर बचाव मंच), बाजीराव ढाकणे, सुहास जायभाये, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, किसन पुंड (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), धनंजय सानप (बीड जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघ), पवार बी. एच. (जिल्हाध्यक्ष, हिंगोली), जमजाळ आर. डी. (प्रसिद्धी प्रमुख) यांच्यासह सहशिक्षक संजय जायभाये, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, राहुल थिटे, नेवळे प्रदीप, कालिदास वनवे, सतिश राठोड व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS