Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही; नियोजनाबाबत महापौरांचे पाणीपुरवठा विभागाला सक्त आदेश

नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौर कविता मुळे यांनी मंगळवार रोजी महापाल

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं?बेजबाबदार कारभारामुळे नांदेडकर हैराण; वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, नागरिकांचा संताप शिगेला
शिंगारवाडी येथे भीषण कृत्रिम पाणीटंचाई; लाखो रुपयांच्या योजनेनंतरही गावकर्‍यांवर पाणीसंकट

नांदेड : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौर कविता मुळे यांनी मंगळवार रोजी महापालिकेच्या मुख्यालयात पाणीपुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेतला. शहरात सध्या जलसाठा मुबलक उपलब्ध असला तरी वितरणातील त्रुटी दूर करून शेवटच्या टोकापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीस पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ड. महेश कनकदंडे, गटनेते संदिपसिंघ गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, नगरसेवक अभिषेक सौदे, आशिष नेरलकर, तुलजाराम यादव, दिलीप कंदकुर्ते, नगरसेवक प्रतिनिधी निलेश पावडे, संतोष मुळे, किशोर भवरे, बजरंगसिंह ठाकुर, नागनाथ गड्डम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पाणीपुरवठा विभागाकडून सद्यस्थिती व आगामी नियोजनाबाबत सादरीकरण करण्यात आले. ‘अमृत 2.0’ योजनेअंतर्गत होणार्‍या कामांचाही आढावा घेण्यात आला. विष्णुपूरी धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून शहरात पाणी कपातीची आवश्यकता नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. जलवाहिन्यांमधील गळती त्वरित शोधून दुरुस्ती करावी, दुरुस्ती कामांना प्राधान्य द्यावे, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. कौठा परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बसवलेल्या मीटर यंत्रणेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे ज्या ठिकाणी पुरवठा खंडित झाला आहे, तेथे तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले. पाणी उपसा केंद्र व जलशुद्धीकरण केंद्रावर वीज खंडित होऊन पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी महावितरणसोबत समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नवीन वसाहती व उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्यास ती समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले.  नांदेडकरांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने तक्रार निवारण यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवावी. कोणत्याही प्रभागात पाणी टंचाईची तक्रार आल्यास संबंधित अधिकार्‍याला जबाबदार धरले जाईल, असा इशारा महापौरांनी दिला. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पिण्याचे पाणी बागेसाठी किंवा वाहन धुण्यासाठी वापरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS