Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाची लिफ्ट 3 महिन्यांपासून बेवारस; अपघात झाल्यास जबाबदार कोण?ओम साई सेवाभावी संस्थेकडे मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट, तरीही नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ

 नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येणारी लिफ्ट तब्बल तीन महिन्यांपासून विनाचालक सुरू असल्याच

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्‍या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
कर्जत शहरातील गुंडगिरी मोडून काढाव्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन



 नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येणारी लिफ्ट तब्बल तीन महिन्यांपासून विनाचालक सुरू असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असलेल्या महापालिका भवनात अशा निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेतील अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र वापरात असलेल्या लिफ्टवर चालक उपलब्ध असून ती व्यवस्थित सुरू आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विविध कामानिमित्त रोज येणार्‍या नागरिकांसाठी असलेल्या लिफ्टला चालक नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून दुहेरी निकष लावले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. महापालिकेतील विविध विभागांमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट ओम साई सेवाभावी संस्था यांच्याकडे असल्याची माहिती मिळत आहे. मग लिफ्टचालक नेमका का उपलब्ध करून देण्यात आलेला नाही? कंत्राटदाराने मनुष्यबळ कमी केले आहे का? की प्रशासनानेच याकडे दुर्लक्ष केले आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेत दररोज शेकडो नागरिक विविध दाखले, कर, बांधकाम परवाने, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू नोंदणी, तक्रारी आणि इतर कामांसाठी येत असतात. यामध्ये महिलांची संख्या मोठी असते. लिफ्ट विनाचालक सुरू असल्याने अचानक तांत्रिक बिघाड, दरवाजा अडकणे, मजल्यांमध्ये अडथळा निर्माण होणे किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी ही बाब अत्यंत धोकादायक मानली जात आहे. महापालिकेसारख्या जबाबदार संस्थेतच सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर सामान्य खासगी इमारतींना प्रशासन कोणता आदर्श देणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कागदोपत्री सुरक्षा उपाययोजना दाखवून प्रत्यक्षात नागरिकांना धोका निर्माण करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापौर आणि आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्वसामान्यांसाठी असलेल्या लिफ्टवर तत्काळ प्रशिक्षित चालक नेमावा, लिफ्टची तांत्रिक तपासणी करावी आणि संबंधित निष्काळजी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. महापालिका भवनातच नागरिकांची सुरक्षितता धोक्यात असेल, तर शहराच्या प्रशासनाचा कारभार किती ढिसाळ आहे, याचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS