आयपीएलच्या सुरुवातीपासूनच पंजाब किंग्सच्या गोलंदाजीवर टीका होत आहे. २०० धावा करण्यासाठी फलंदाजांवर अवलंबून राहिलेले संघाचे गोलंदाज हे लक्ष्य वाचव
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच पंजाब किंग्सच्या गोलंदाजीवर टीका होत आहे. २०० धावा करण्यासाठी फलंदाजांवर अवलंबून राहिलेले संघाचे गोलंदाज हे लक्ष्य वाचवण्यात अपयशी ठरले. आजच्या सामन्यात हे स्पष्ट झाले, जेव्हा मुंबईला विजयासाठी शेवटच्या १८ चेंडूंमध्ये ५० धावांची गरज होती, पण गोलंदाज अपयशी ठरले. धर्मशाला येथे गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर, प्रभसिमरन सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकांत आठ गडी गमावून २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईने १९.५ षटकांत चार गडी गमावून २०५ धावा करत सामना जिंकला. पंजाबकडून अझमतुल्ला ओमरझाईने दोन बळी घेतले, तर मार्को जेनसन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यापूर्वीच स्पर्धेतील आव्हान संपलेल्या मुंबईने विजय मिळवून स्वतःची लाज राखली असली तरी या पराभवाने पंजाबच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा हादरा बसला आहे. कारण त्यांना पुढील दोन्ही सामने जिंकावेच लागतील. यातील एक जरी सामना त्यांनी गमावला तर त्यांना प्ले ऑफचे स्वप्नही गमवावे लागेल .
पंजाबचे गोलंदाज शेवटच्या १८ चेंडूंमध्ये ५० धावा वाचवू शकले नाहीत.
रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी या सामन्यात मुंबईला चांगली सुरुवात करून दिली होती. त्या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली, जी ओमरझाईने तोडली. त्याने रिकल्टनला प्रियांश आर्याकरवी झेलबाद केले, जो २३ चेंडूंमध्ये ४८ धावा करून बाद झाला. त्यानंतर जॅनसेनने नमन धीरला बाद केले, जो केवळ नऊ धावा करू शकला. रोहित (२५) सुद्धा चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
८८ धावांत तीन गडी गमावल्यानंतर मुंबईला एका मोठ्या भागीदारीची गरज होती. तिलक वर्मा आणि शेर्फेन रदरफोर्ड यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी ४२ चेंडूंमध्ये ६१ धावांची भागीदारी केली. रदरफोर्ड २० धावांवर बाद झाला. त्यावेळी मुंबईची धावसंख्या १४९ धावांवर चार गडी बाद अशी होती. विल जॅक्स फलंदाजीसाठी आला. त्याने आणि तिलक वर्माने पाचव्या विकेटसाठी नाबाद ५६ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. तिलकने २५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ३३ चेंडूंमध्ये ७५ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, विल जॅक्स दोन चौकार आणि दोन षटकारांसह १० चेंडूंमध्ये २५ धावांवर नाबाद राहिला.
या सामन्याने पंजाबच्या गोलंदाजीतील कमकुवतपणा उघड केला. पंजाबचे गोलंदाज शेवटच्या १८ चेंडूंमध्ये ५० धावा वाचवू शकले नाहीत. जॅनसेनने १८ व्या षटकात २२ धावा दिल्या. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या अर्शदीप सिंगने १५ धावा दिल्या. आता मुंबईला शेवटच्या सहा चेंडूंमध्ये १५ धावांची गरज होती, त्यामुळे बार्टलेटकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. मात्र, दबावाखाली बार्टलेट चांगली कामगिरी करू शकला नाही आणि मुंबईने दिमाखदारपणे सामना जिंकला.
पंजाब किंग्सने इतिहास रचला
या सामन्यात पंजाब किंग्सने एक मोठा विक्रम रचला. दोन वेगवेगळ्या हंगामांमध्ये आठ वेळा २०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा हा संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला फ्रँचायझी ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील एक विशेष विक्रम
आयपीएलच्या इतिहासात, आतापर्यंत फक्त तीन संघांनी एकाच हंगामात आठ वेळा २००+ धावा केल्या आहेत ते असे – पंजाब किंग्स: २०२५ आणि २०२६. गुजरात टायटन्स: २०२५. सनरायझर्स हैदराबाद: २०२६.
पंजाब किंग्स आता दोन वेगवेगळ्या हंगामांमध्ये हा पराक्रम करणारा एकमेव संघ ठरला आहे.
प्रियांश आणि प्रभसिमरनने वेगवान सुरुवात करून दिली
पंजाबने शानदार सुरुवात केली. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी ३३ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. प्रियांश १७ चेंडूंमध्ये २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने कूपर कॉनोलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंमध्ये ५७ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरनने ३२ चेंडूंमध्ये ५७ धावांची वेगवान खेळी केली. त्याच्या बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव अडखळला आणि विकेट्स पडतच राहिल्या.
ओमरझाई आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला.
मधल्या फळीत, अझमतुल्ला ओमरझाईने आक्रमक फलंदाजी करत १७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. त्याच्या खेळीत चार षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. अखेरीस, झेवियर बार्टलेटने नाबाद १८ धावा आणि विष्णू विनोदने नाबाद १५ धावा करून संघाला २००/८ पर्यंत पोहोचवले. शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्ससाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार बळी घेतले. दीपक चहरनेही दोन बळी घेतले, तर कॉर्बिन बॉश आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
नियमित कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात मुंबईकडून खेळला नाही, तसेच आतापर्यंत त्याच्या जागी नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादवही अनुपलब्ध आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. हार्दिक पांड्या सलग तिसऱ्या सामन्यासाठी संघाबाहेर
मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या गेल्या तीन सामन्यांमध्ये खेळलेला नाही. हार्दिक या हंगामात शेवटचा २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात खेळला होता. त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले. आता, सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर असल्याने, बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात तीन खेळाडूंनी संघाचे नेतृत्व करण्याची ही पाचवी वेळ आहे.
मुंबई इंडियन्ससाठी एकाच हंगामात तीन खेळाडूंनी संघाचे नेतृत्व करण्याची ही दुसरी वेळ आहे.
यापूर्वी, २००८ मध्ये हरभजन सिंग, शॉन पोलॉक आणि सचिन तेंडुलकर यांनी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते.
२०१३ मध्ये मॅथ्यूज, रॉस टेलर आणि ॲरॉन फिंच यांनी पुणे वॉरियर्सचे नेतृत्व केले होते.
२०२१ मध्ये डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि मनीष पांडे यांनी सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले.
इतकेच नाही, तर २०२४ मध्ये शिखर धवन, सॅम करन आणि जितेश यांनी पंजाब किंग्सची जबाबदारी स्वीकारली.
अर्शदीप वादाच्या भोवऱ्यात ?
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग त्याच्या सोशल मीडियावरील वागणुकीमुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. गुरुवारी, मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मासोबत विनोद करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, अनेक वापरकर्त्यांनी या विनोदावर टीका करत त्याला वर्णद्वेषी टिप्पणी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अर्शदीप स्नॅपचॅटवर तिलक वर्मासोबत चॅट करताना दिसत आहे. व्हिडिओदरम्यान, त्याने कथितरित्या तिलकचा उल्लेख ‘काळोख’ असा केला. इतकेच नाही, तर त्याने विनोदाने तिलकला सनस्क्रीन लावण्याचा सल्लाही दिला. अर्शदीपने व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू नमन धीरला पंजाबचा खरा ‘नूर’ म्हटले. ‘नूर’ या शब्दाचा अर्थ प्रकाश असा होतो. नमन धीरने तिलकला . या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला, ज्यावर तिलकने उत्तर दिले की तोआधीच सनस्क्रीन वापरत .व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडूंमधील वातावरण हलकेफुलके आणि मैत्रीपूर्ण दिसत असले तरी, सोशल मीडियावरील अनेकांना अर्शदीपची ही टिप्पणी आक्षेपार्ह वाटली.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. ९०९६३७२०८२

COMMENTS