नीट पेपरफुटी आणि शिक्षणाचा बाजार !

Homeअग्रलेख

नीट पेपरफुटी आणि शिक्षणाचा बाजार !

देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटला. तो पेपर एका राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात लीक झाल्याचे दिसून येत आहेे. त्याची

परीक्षा घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके समर्थकांसह दिल्लीत आंदोलनासाठी सज्ज!
नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
नीट, महागाई व कांदा दर प्रकरणी काँग्रेस आक्रमक


देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटला. तो पेपर एका राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात लीक झाल्याचे दिसून येत आहेे. त्याची व्याप्ती सध्यातरी राजस्थान उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यात दिसून येत असली तरी, नीट पेपरफुटी आणि त्यातून शिक्षणाचा कसा बाजार मांडला, याचे वास्तव चित्रण दिसून येत आहे. कारण पेपरफुटीपासून ते पेपरविक्रीपर्यंत कोट्यावधी रूपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा मास्टरमाईंड कोण?याचा शोध घेण्याची खरी गरज आहे.
नीट-2026 परीक्षेच्या पेपरफुटीने फक्त विद्यार्थ्यांचा विश्‍वास नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आधार धोक्यात आणला आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, लातूर आणि नागपूरमध्ये पोलिस आणि सीबीआयच्या कारवाईत अनेक जण ताब्यात आले. मनिषा वाघमारे, धनंजय लोखंडे, अभियांत्रिकी विद्यार्थी आणि आयुर्वेदिक डॉक्टर यांच्यासह या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पकडले गेले. या प्रकरणाने सिद्ध केले की, शिक्षणातली सुरक्षा ही केवळ कागदोपत्री आहे; प्रत्यक्षात, पेपरफुटी ही सहज शक्य आहे. पुण्यातील वाघोली येथे वास्तव्यास असलेला आणि मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे हा आरोपी या प्रकरणात मोठा सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. संशय आहे की त्याने शुभम खैरनारला ईमेलद्वारे पेपर पाठवला. मनिषा वाघमारे या गृहिणीने आपल्या मुलीच्या परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर आरोपींच्या संपर्कात येऊन ही फसवणूक सुरू केली. तिच्या बँक खात्यात 21 जणांकडून 10 लाख रुपये जमा झाले, जे या प्रकरणात शिक्षणाचा कसा बाजार मांडला, त्याचे उदाहारण आहे. पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, मनिषा प्रत्येक विद्यार्थ्याकडून 25 हजार रुपये वसूल करीत होती. ही फसवणूक केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नाही, तर एक ठोस व्यवसायासारखी रचना झाली होती. सोशल मीडियावर जाहिराती पाहून पालकांनी संपर्क साधला, आणि त्यातून मुलांचा विश्‍वास विकला गेला. एका सामान्य पालकाने आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी केलेल्या प्रयत्नातून, फसवणूक सुरू झाली आणि व्यापारीक स्तरावर पोहोचली. लातूरमध्ये क्लासेस संचालक, मॉक टेस्ट पेपर सेटर प्राध्यापक, विद्यार्थिनी आणि हॉस्टेल कर्मचारी यांची चौकशी झाली. पुण्यातील सुखसागरनगरमध्ये मनिषा वाघमारेसह तिघांना अटक करण्यात आली, तर नाशिकमध्ये शुभमच्या रूममेट्सचे जबाब नोंदवण्यात आले. या सर्व तपासातून दिसते की, शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षा त्रुटी इतक्या स्पष्ट आहेत की, एक सामान्य व्यक्तीही प्रश्‍नपत्रिका चोरी करू शकते. या प्रकरणात ‘सायबर’ तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे लक्षात येते. ईमेल, सोशल मीडियाच्या चॅटिंग आणि ऑनलाइन पेमेंट्सचा उपयोग करून गुन्हेगारांनी योजना राबवली. हे दाखवते की, डिजिटल यंत्रणा असूनही, परीक्षेच्या सुरक्षेत कमकुवतपणा आहे. फक्त कागदोपत्री नियम किंवा क्लासरूममध्ये देखरेख पुरेशी नाही. शेकडो विद्यार्थी आणि त्यांचे पालक विश्‍वास ठेवून परीक्षेत सहभागी होतात. मेहनत करून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या फसवणुकीमुळे त्रस्त झाले आहेत. मनिषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यासारख्या आरोपींनी विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले. फसवणुकीचा व्यापारीक स्वरूप असलेला हा प्रकरण सामाजिकदृष्ट्या धक्कादायक आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एनटीएला हटवून प्रश्‍नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल लॉकिंग सिस्टम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट्स आणि न्यायाधीशांच्या देखरेखीखाली परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. यामुळे स्पष्ट होते की, समस्या गंभीर आहे आणि यंत्रणेत सुधारणा करण्याशिवाय भविष्यात अशा प्रकारचे घोटाळे पुन्हा घडतील. ही घटना एक स्पष्ट संदेश देते: मेहनत आणि प्रामाणिकतेवर आधारित शिक्षणावर संकट आले आहे. जर शिक्षण व्यवस्थेत सुरक्षा उपाय आणि जबाबदारीची कमतरता राहिली, तर भविष्यातील प्रत्येक परीक्षेचा विश्‍वास धोक्यात येईल. पालक, शिक्षक, संस्था आणि सरकार यांना एकत्र येऊन कठोर उपाय करणे आवश्यक आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरण ही केवळ शैक्षणिक घोटाळा घटना नाही, तर शिक्षण व्यवस्थेवरील मोठा आघात आहे. व्यावसायिक फसवणूक, डिजिटल चोरी आणि सामाजिक विश्‍वासाचे उल्लंघन या सर्वांनी शिक्षण क्षेत्रात गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची सुरक्षा आणि परीक्षेतील प्रामाणिकता हे सुनिश्‍चित करण्यासाठी कठोर नियम, डिजिटल तंत्रज्ञान आणि जबाबदारीची जाणीव याशिवाय काहीच मार्ग नाही. शेवटी, शिक्षण फक्त ज्ञान देण्यापुरते नाही, तर विद्यार्थ्यांचा विश्‍वास जपणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे यामध्ये आहे. नीट पेपरफुटीने समाजासमोर हे सत्य उभे केले आहे की, जर आपण कठोर उपाय न घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड ही उद्याची समाजव्यवस्था पोखरू शकते. त्यामुळे ही कीड वेळीच रोखण्याची खरी गरज आहे. नीट परीक्षा आयोजन करणारे त्यांच्याकडून हा पेपर कसा लीक झाला, तेथील मूळ सूत्रधार कोण ? याची चौकशी करण्याची गरज आहे. कारण ही परीक्षा घेणारे एनटीए चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहे. त्यांच्या कार्यालयातील, मुख्य सुत्रांचा हात असल्याशिवाय हा पेंपर बाहेर लीक होऊ शकत नाही. कारण पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि राजस्थान राज्यांत फिरणारा हा पेपर असा तसा बाहेर आलेला नाही. तो आणलेला आहे, त्यातून कोट्यावधी रूपये अवैध मार्गांने कमवण्याचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

COMMENTS