तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्ब

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी काँग्रेसने गुरुवारी अधिकृत घोषणा केली. सतीशन हे पारावूर मतदारसंघाचे आमदार आहेत.
काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्सी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सात मे रोजी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँगे्रस नेते खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सतीशन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर सतीशन यांनी प्रतिक्रिया देताना, हे पद माझ्यासाठी वैयक्तिक यश नाही, तर दैवी कृपा आहे, असे म्हटले. तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन सरकार चालवण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन यांच्यासह के.सी. वेणूगोपाल, रमेश चेन्निथलायांच्या नावांची जोरदार चर्चा होती. पक्षामध्ये विविध गट पडल्याने निर्णय प्रक्रियेला विलंब झाला होता. सतीशन यांना नव्या पिढीचा आक्रमक चेहरा मानले जात असल्याने कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. दुसरीकडे वेणुगोपाल यांना केंद्रीय नेतृत्वाचा निकटवर्तीय नेता मानले जात होते. अनेक आमदार त्यांच्याच बाजूने असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र राज्यातील काही भागांत वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री करू नये, अशी मागणी करणारे फलकही झळकले होते. वायनाडसह विविध शहरांत सतीशन समर्थकांनी जोरदार प्रचार केला होता. सतीशन यांच्या नावाची घोषणा होताच तिरुवनंतपुरममधील काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांनी जल्लोष केला. फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, वेणुगोपाल यांनी पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत, एक निष्ठावान काँग्रेसी म्हणून आम्ही सर्वजण पक्षाच्या निर्णयासोबत आहोत, असे म्हटले. काँग्रेस खासदार यांनीही हा निर्णय राज्याच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन घेतल्याचे सांगितले. केरळ विधानसभा निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडीने 140 पैकी 102 जागांवर विजय मिळवला. त्यापैकी काँग्रेसने 63 जागा जिंकत मोठे यश मिळवले आहे.

COMMENTS