पारनेर : वडझिरे टेलटँक ते शिवडोह तलाव जोडणाऱ्या भूमिगत बंदिस्त नलिका प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून कामाची प्

पारनेर : वडझिरे टेलटँक ते शिवडोह तलाव जोडणाऱ्या भूमिगत बंदिस्त नलिका प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पारनेर येथे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आमदार दाते यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. भूमिगत बंदिस्त नलिकेच्या कामादरम्यान शेतकऱ्यांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच कामाचा दर्जा उच्च प्रतीचा राखणे, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आणि निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च देत प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सातत्याने प्राधान्य समन्वय राहावा, उद्भवणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे तसेच कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सिंचन व्यवस्थेला मोठा हातभार लागणार असून शेतीला अधिक स्थिर पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कामाच्या अंमलबजावणीसंदर्भातील तांत्रिक बाबी, येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनीही आपल्या समस्या मांडत काम वेगाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस नारायणगाव कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, पिंपळगाव जोगे उपविभागाचे सहाय्यक अभियंता रितेश आदलिंगे, कनिष्ठ अभियंता सुरज कुदळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, नगरसेवक अशोकराव चेडे तसेच वडझिरे येथील शेतकरी अरुण गंधाक्ते, नाना गंधाक्ते, डॉ. चौधरी, सावकार मोरे, तुळशीराम मोरे, शिवाजी जाधव, अंकुश मोरे, बाळू मोरे, विश्वनाथ चौधरी, भीमा सुरूडे यांच्यासह अनेक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. बैठकीमुळे प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, भूमिगत बंदिस्त नलिका प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास वडझिरे व परिसरातील शेतीसाठी सिंचन व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS