शेवगाव: नगरपरिषदेने दोन महिन्यांपूर्वी राबवलेल्या धडक अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर बाधित झालेल्या टपरीधारकांचे अद्याप पुनर्वसन न झाल्याने स्थानिक व्य

शेवगाव: नगरपरिषदेने दोन महिन्यांपूर्वी राबवलेल्या धडक अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर बाधित झालेल्या टपरीधारकांचे अद्याप पुनर्वसन न झाल्याने स्थानिक व्यापारी अत्यंत आक्रमक झाले आहेत. कोणतीही पर्यायी जागा न देता उघड्यावर आणलेल्या या कुटुंबांचा प्रपंच आता गंभीर संकटात सापडला आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभाराविरोधात ‘शेवगाव टपरीधारक पुनर्वसन कृती समिती’ने आक्रमक पवित्रा घेतला असून, तातडीने पुनर्वसनाचा निर्णय न झाल्यास थेट अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’ छेडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, यावेळी माजी जि. प. सदस्य संदेश कार्ले यांच्यासह शेकडो व्यापारी उपस्थित होते. यासंदर्भातील मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ वाव्हुळे यांनी स्वीकारले.
शेवगाव शहरातील अत्यंत मध्यवर्ती आणि गजबजलेल्या क्रांती चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गट क्र. १६२९) आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (गट क्र. १०२६) कंपाऊंडला लागून अनेक लहान-मोठे व्यापारी गेली अनेक वर्षे अधिकृतपणे व्यवसाय करत होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी नगरपरिषदेने कोणतीही पूर्वकल्पना किंवा पर्यायी व्यवस्था न करता अचानक धडक कारवाई करत हे सर्व व्यापारी गाळे जमीनदोस्त केले. यातील बहुतांश व्यापारी हे वयोवृद्ध असून, त्यांचा एकमेव अर्थार्जनाचा मार्ग बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
काय आहे ‘बीओटी’ शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव?
टपरीधारकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी तत्कालीन जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १० जानेवारी २०२३ रोजी शासनाकडे एक परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यामध्ये गट क्र. १६२९ व १०२६ च्या जागेवर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ‘पे अँड पार्क’ उभारणे प्रस्तावित असून, यासाठी आवश्यक मोजणी, नकाशा, आराखडे आणि अंदाजपत्रक या सर्व प्रशासकीय व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत.
यातील क्रांती चौकातील जि. प. शाळेची जुनी इमारत अत्यंत धोकादायक झाली असून ती पाडण्याचे आदेशही प्राप्त झालेले आहेत. मात्र, तांत्रिकदृष्ट्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही ही फाईल केवळ काही राजकीय व स्वार्थी हितसंबंधांमुळे रोखून धरल्याचा गंभीर आरोप कृती समितीने केला आहे.
“सदर जागेवर ‘बीओटी’ तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास बाधित टपरीधारकांना अधिकृत व कायदेशीर रोजगाराची जागा मिळेल. सोबतच, क्रांती चौकातील भीषण वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमाचा प्रश्न कायमचा सुटेल. प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी.”
— शेवगाव टपरीधारक पुनर्वसन कृती समिती

COMMENTS