श्रीगोंदा : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह न्यायालयीन कामकाज सुरळीत व विनाव्यत्यय पार पडावे यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिम

श्रीगोंदा : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह न्यायालयीन कामकाज सुरळीत व विनाव्यत्यय पार पडावे यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत अजामीनपात्र वॉरंट (एन.बी.डब्ल्यू.) असलेल्या २१ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना संबंधित न्यायालयांमध्ये हजर करण्यात आले असून, त्यापैकी अनेक आरोपींची न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा कारागृहासह विविध कारागृहांमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीसाठी वारंवार समन्स व बी.डब्ल्यू. वॉरंट बजावूनही संबंधित आरोपी, साक्षीदार किंवा फिर्यादी न्यायालयात हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे माननीय श्रीगोंदा, बारामती, जुन्नर व दौंड न्यायालयांनी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेत प्रलंबित असलेल्या एकूण ३५९ अजामीनपात्र वॉरंटपैकी २१ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश गेला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीगोंदा, काष्टी, पेडगाव, अजनूज, बेलवंडी स्टेशन, शेडगाव, भिंगण, देऊळगाव, हिरडगाव, औटेवाडी आणि इतर भागांतील व्यक्तींचा समावेश आहे. विविध न्यायालयांनी काढलेल्या वॉरंटच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेद्वारे न्यायालयीन आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनी न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार निश्चित तारखेला व वेळेत न्यायालयात उपस्थित राहावे, अन्यथा अटकेची कारवाई व कारागृहाची शिक्षा भोगावी लागू शकते, असे आवाहन श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, मनोहर खिळदकर, पवन मोहिते, भगवान गांगर्डे यांच्यासह पोलीस अंमलदार आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून न्यायालयीन प्रक्रियेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांसाठी ती एक मोठा इशारा मानली जात आहे.

COMMENTS