नांदेड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग

नांदेड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे गुरुवारी गोदावरी नदी पात्रातील विष्णुपुरी-काळेश्वर धरण परिसरात शोध व बचाव कार्याचे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार हे प्रात्यक्षिक पार पडले.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होणे, सखल भागात पाणी साचणे किंवा नागरिक पुरात अडकण्याच्या घटना लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य कसे करावे, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्पीड बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, अत्याधुनिक दोरखंड तसेच शोध दिव्यांचा वापर करण्यात आला. यावेळी अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेल्या इन्फ्लेटेबल रबर बोटचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच आउट बोट मशीनची पाण्यात तपासणी करून त्याची कार्यक्षमता पडताळण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून नागरिक, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. या मॉक ड्रिलवेळी उपायुक्त नितीन गाढवे, अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे तसेच उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव प्रात्यक्षिक पार पडले. अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी या सरावात सहभागी झाले होते.

COMMENTS