महात्मा फुले  : व्यवस्थेला भिडून बदल घडवणारा महामानव!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले  : व्यवस्थेला भिडून बदल घडवणारा महामानव!

       महात्मा जोतीबा फुले, हे नाव म्हणजे अन्यायाच्या मस्तकावर प्रहार करणारा वज्र! हे नाव म्हणजे अंधश्रद्धा, जातिवाद आणि सामाजिक गुलामगिरीच्या सा

चार हजार एकर जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह; खा. लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; व्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अवकाळीग्रस्तांना तातडीची मदत द्या : वडेट्टीवारांची मागणी
येडेश्वरीचे सर्वाधिक गाळप; कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न 9.22 लाख मेट्रिक टन ऊस गाळप; खा.बजरंग सोनवणे यांनी शेतकरी-कामगारांचे केले कौतूक

       महात्मा जोतीबा फुले, हे नाव म्हणजे अन्यायाच्या मस्तकावर प्रहार करणारा वज्र! हे नाव म्हणजे अंधश्रद्धा, जातिवाद आणि सामाजिक गुलामगिरीच्या साखळ्या तोडणारा ज्वालामुखी! आज आपण त्यांच्या विचारधारेला फक्त वाचत नाही, तर ती आपल्या रक्तात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण फुले हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, ते एक लढा आहेत, एक बंड आहे, एक जिवंत ज्वाला आहे! फुले यांनी जेव्हा समाजातील खालच्या थरातील लोकांवर होणारा अन्याय पाहिला, तेव्हा त्यांनी शांत बसण्याचा मार्ग निवडला नाही. त्यांनी तलवारीऐवजी शिक्षणाचे शस्त्र उचलले. त्यांनी त्या काळातील ब्राह्मणवादी वर्चस्व, स्त्री-दडपशाही आणि अज्ञानाच्या अंधाराला थेट आव्हान दिलं. त्यांनी थेट प्रश्न केला की, “माणूस माणसाचा शत्रू का बनतो?” आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं.त्यांची विचारधारा ही मऊ, समजूतदार किंवा तडजोड करणारी नव्हती. ती थेट भिडणारी होती. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत समाजात समानता येत नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही! त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं, शूद्र-अतिशूद्रांना आत्मभान दिलं, आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. आजही जर आपण जात-पात, अंधश्रद्धा, भेदभाव यामध्ये अडकलेलो असू, तर ते महात्मा फुले यांच्या विचारांशी गद्दाफी ठरेल! आपण ज्योतीबा फुले यांना फक्त “महात्मा” म्हणून गौरवतो, पण त्यांच्या विचारांचा अंगीकार करतो का? जर आपल्या आजूबाजूला अन्याय होत असेल आणि आपण गप्प बसत असू, तर आपण त्यांच्या वैचारिक वारसाशी धोका करतो आहोत. फुले यांची खरी पूजा म्हणजे त्यांच्या विचारांप्रमाणे वागणं, अन्यायाविरुद्ध उभं राहणं, शिक्षणाचा प्रसार करणं, आणि प्रत्येक माणसाला समानतेने वागवणं.आजच्या काळात फुले यांची गरज अधिक तीव्र आहे. कारण आधुनिकतेच्या नावाखाली अजूनही विषमता जिवंत आहे, किंबहुना ती अधिक वाढली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून क्रांती होत नाही! क्रांती होते ती रस्त्यावर उतरून, अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, आणि स्वतःच्या कृतीतून बदल घडवून. आजचा समाज तांत्रिकदृष्ट्या प्रगत असला तरी सामाजिक विषमता, स्त्री-पुरुष भेदभाव, जातीयवाद आणि शिक्षणातील असमानता अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत फुले यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात.शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे, ही त्यांची धारणा आजही तितकीच लागू आहे. डिजिटल युगात शिक्षणाची उपलब्धता वाढली असली तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे फुले यांच्या ‘सर्वांसाठी शिक्षण’ या तत्त्वाची अंमलबजावणी आजही आवश्यक आहे.स्त्री सक्षमीकरणाच्या बाबतीतही फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. आजही स्त्रियांना अनेक क्षेत्रांत समान संधी मिळत नाहीत. त्यामुळे स्त्री शिक्षण आणि स्वावलंबन यावर त्यांनी दिलेला भर आजच्या धोरणांमध्ये प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांच्या विचारांना फक्त शब्दांत नाही, तर कृतीत उतरवूया. त्यांच्या लढ्याला पुढे नेऊया. अन्यायाच्या विरोधात उभं राहणं, हेच त्यांना खरं अभिवादन आहे!महात्मा जोतीबा फुले यांचे जीवन हे संघर्ष, धैर्य आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्या विचारांची कृतीत अंमलबजावणी केली. त्यांच्या जन्म द्विशताब्दीच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा केवळ गौरव न करता, त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात आणि समाजात रुजवणे ही खरी आदरांजली ठरेल.त्यांचे कार्य आपल्याला सांगते की, समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समानतेसाठी झटणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते, आणि म्हणूनच फुले हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून, ते वर्तमान आणि भविष्य घडवणारे प्रेरणास्त्रोत आहेत.

COMMENTS