Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समता आणि मानवतेचे महानायक महात्मा फुले 

11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. कारण महात्मा ज्

दहिफळ येथे भीम जयंतीचा जल्लोष: सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी सोहळा
आई-वडिलांचा संघर्ष प्रेरणा देत राहतो…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
सार्वजनिक सत्य धर्म : मानव कल्याणाचा विचार

11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्य हे भारतात समता, मानवता आणि बंधुता प्रस्थापित करणारे होते. त्यांनी केलेली सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती ही अद्भुत आणि अलौकिक होती. निरपेक्ष भावनेने, उदात्त अंतःकरणाने आणि मानवतावादी दृष्टिकोनाने त्यांनी जे क्रांतिकारी कार्य केले त्याला तोड नव्हती. आणि म्हणूनच विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुचे स्थान दिले होते. यावरुन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची व विचारांची महत्ती लक्षात येते. भारतात इंग्रजांची जुलमी राजवट असताना, त्यांच्या मनमानी व असंवेदनशील कारभारामुळे एकीकडे सामान्य जनतेची अपार पिळवणूक होत होती. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला वर्णभेदामुळे व जाती प्रथेमुळे उच्चवर्णियांकडून मागास प्रवर्गातील जनतेची होणारी कमाल मर्यादेची अमानुष पिळवणूक मानवतेला कलंकित करत होती. हे पाहून व्यथित झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी वर्णभेद आणि जातीयतेची इमारत उध्वस्थ करण्याचा निश्‍चय केला. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकर्‍यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ लिहून वर्णभेदाचे षडयंत्र, जातीयतेची प्रथा व गुलामगिरीची साखळी पूर्णतः खिळखिळी करून टाकली. 1848 मध्ये पुणे शहरात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली पुणे शहरातील आपल्या घरातील पाण्याचा हौद मागासवर्गीयांसाठी त्यांनी खुला केला होता तेव्हा धर्म बुडाला म्हणून उच्च वर्णियांनी गरळ ओकली होती. मुलींना शिक्षण शिकवणार्‍या त्यांची पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दगड गोट्यांचा व शेणाचा मारा सहन करावा लागला होता. एकदा नव्हे तर अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला पण झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निडर वृत्तीला, मानवतावादी विचारांना, त्यांच्या कणखरपणाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी बालविवाहाला प्रतिबंध केला, विधवा स्त्रियांचे बाळंतपण केले, विधवांचे पुनर्विवाह सुरू केले. शेतकर्‍यांना हक्क मिळवून दिले. 1870 मध्ये पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली सार्वजनिक जयंती साजरी केली. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून अनेक अनिष्ट रूढी परंपरावर प्रहार केले. अस्पृश्यता निवारणाचे खंबीरपणे कार्य केले. सर्वांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1888 मध्ये ज्योतिबा फुले यांचे अलौकिक व उत्तूंग असे न्यायवादी, समतावादी व मानवतावादी सामाजिक व शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन त्यांना महात्मा ही पदवी देऊन गौरविण्यात आले. यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन लढा समस्त मानवांच्या कल्याण्याचा व समाजहिताचा होता. हे लक्षात घेऊन समस्त भारतीयांनी अगदी आदराने, सन्मानाने व अभिमानाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली पाहिजे. त्यांना कोटी कोटी वंदन करणे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे. समतेचे व मानवतेचे महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी वंदन!

बबन गुळवे
मो : 9545442648

COMMENTS